पिंपरी : ‘आयुष्यामध्ये पदे येत-जात राहतात. आमदार, मंत्रीपद कायमचे नाही. परंतु, पदावर असताना सामान्य गोरगरीब जनतेला त्याचा किती फायदा झाला, हेच अखेरपर्यंत टिकून राहते. पदांच्या माध्यमातून लोकसेवा करणे महत्त्वाचे’, असल्याचे विधान राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ३७१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा भरणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार शंकर जगताप, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका रेश्मा भुजबळ, शीतल वर्णेकर, वसंत लोंढे, मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यावेळी उपस्थित होते. माजी नगरसेवक बबनराव बोराटे यांना ‘संत शिरोमणी’, प्रतापराव गुरव यांना ‘संत काशिबा गुरव’, सुरेश दर्शिले, बाळासाहेब सातव यांना ‘कृषीभूषण’, भरत आल्हाट, सदाशिव बोराटे यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘गेली २४ वर्षे अविरतपणे हा कार्यक्रम राबवून समाजबांधवांना एकत्र आणणे, त्यांच्या अडचणी सोडवणे आणि चांगल्या कामाची पावती देणे ही कौतुकास्पद बाब आहे. प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेऊन पुरस्कार दिले जातात. यातून पुरस्कारार्थींना चांगल्या प्रकारची प्रेरणा, एक ऊर्जा मिळते, असेही भरणे म्हणाले.
‘आयुष्यामध्ये काय आहे? आयुष्यामध्ये पदे येतील, पदे जातील. मी राज्याचा कृषीमंत्री आहे. श्रीमंती किंवा गरिबीपेक्षा माणसातील माणुसकी महत्त्वाची असते. आमदारकी किंवा मंत्रीपद ही पदे कायमस्वरूपी नसतात, ती येतात आणि जातात. परंतु, पदावर असताना सामान्य गोरगरीब जनतेच्या किती उपयोगी आलो, हेच टिकून राहते. माळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली जाईल’, अशी ग्वाही भरणे यांनी दिली. ‘लांब पल्ल्यांच्या यात्रा करून देव शोधण्यापेक्षा जिवंतपणी आपल्या आई-वडिलांची सेवा करणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे. संत सावता महाराजांनी ७५० वर्षांपूर्वी दिलेल्या ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’ या संदेशातून आपल्या कष्टालाच देव मानण्याची शिकवण मिळते’, असेही ते म्हणाले.
अजितदादांचे काम दोनशे वर्षे लक्षात राहील
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वसामान्य माणसांचे आणि शेतकऱ्यांचे खरे नेते होते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कला दादांकडे होती. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या आणि पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विकासासाठी केलेले काम पुढील दोनशे वर्षे लक्षात राहील, असेही भरणे म्हणाले.
