पुणेः दौंड तालुक्यातील गर्भलिंग निदान रॅकेट उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने केवळ गुन्हे दाखल करण्यावर न थांबता संपूर्ण तालुक्यात व्यापक तपासणी मोहीम राबवली. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणेच्या समन्वयातून बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात आली. बुधवारपर्यंत ११ खासगी रुग्णालयांवर ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट’अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ४ जून रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालय आणि पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम आणि वैद्यकीय गर्भपात अधिनियम अंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरारी पथके तयार करण्यात आली. या पथकांनी ५ आणि ६ जून रोजी दौंड शहर आणि तालुक्यातील विविध खासगी आरोग्य संस्थांची तपासणी केली. या मोहिमेत २५ सोनोग्राफी केंद्रे, २० गर्भपात केंद्रे आणि १९ नर्सिंग होम, अशा एकूण ६४ आरोग्य संस्थांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी नोंदी ठेवण्यातील त्रुटी, आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आले. विशेषतः एका हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय गर्भपात अधिनियमातील गंभीर उल्लंघन झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आणि यवत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
याशिवाय, संबंधित हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले असून, संबंधित केंद्राविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील कारवाईत लवंगिरे हॉस्पिटल तसेच माहेर हॉस्पिटलच्या गर्भपात केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली. या संस्थांच्या परवान्यांवरही गदा आली आहे. आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील आणखी ११ खासगी रुग्णालयांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा फटका केवळ आरोपींपुरता मर्यादित न राहता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर संस्थांनाही बसण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपातासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाभर तपासण्या सुरू राहणार असून, कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदा वैद्यकीय व्यवसाय आणि गर्भलिंग निवडीच्या प्रकारांवर मोठा प्रतिबंध निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्दे
- पहिल्या २ दिवसांत ६४ आरोग्य संस्थांची तपासणी
- २५ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी
- २० गर्भपात केंद्रांची तपासणी
- १९ नर्सिंग होमची तपासणी
- लवंगिरे हॉस्पिटलचे सोनोग्राफी मशीन सील
- दोन रुग्णालयांच्या गर्भपात केंद्रांची मान्यता रद्द
- ११ रुग्णालयांवर पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू
- गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमकायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू
