पुणे : उपाहारगृहात झालेल्या सिलिंडर स्फोटात दहा कामगार होरपळल्याची घटना दौंड परिसरात बुधवारी दुपारी घडली. अपघातात पाच जण गंभीर होरपळले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

‘दौंड-पाटस रस्त्यावरील एका उपहारगृहात बुधवारी दुपारी सिलिंडरमधून गॅस गळती झाली. त्या वेेळी उपाहारगृहात ग्राहक नव्हते. भटारखान्यात काम करणारे दहा कामगार होरपळले. सिलिंडरचा स्फाेट झाल्यानंतर भटारखान्यातील साहित्याचे नुकसान झाले, तसेच खिडक्यांच्या काचा फुटल्या. दुर्घटनेत पाच कामगार गंभीर होरपळले असून, त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेमकी दुर्घटना कशी घडली, याबाबत तपास करण्यात येत आहे,’ अशी माहिती दौंड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी दिली.

‘या घटनेची माहिती मिळताच दौंड नगरपरिषद, तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. स्फोटामुळे आग लागली होती. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली’, असे कुरकुंभ औद्योगिक वसाहत अग्निशमन दलाचे अधिकारी किरण पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, अपघाताची नोंद दौंड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत भटारखान्यातील सिलिंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.