पुणे : ‘गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने राज्यभरात भेसळीविरुद्ध छापे टाकण्यात येत असल्याचा धसका दौंडमधील परप्रांतीय गूळ उत्पादकांनी घेतला असून, गेल्या दोन दिवसापासून त्यांचे कामकाज पूर्ण बंद झाले आहे. तर, बहुतांश गूळ उत्पादकांनी आपला गाशा गुंडाळला आहे,’ अशी माहिती दौंडमधील गूळ व्यापाऱ्यांनी दिली. भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाईचे स्वागत होत असले, तरी गेले अनेक दिवस अशा प्रकारच्या गूळनिर्मितीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होते का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यात अनेक परप्रांतीय जागा भाड्याने घेऊन गुऱ्हाळे चालवीत आहेत. या परप्रांतीयांची गूळ बनवण्याची पद्धत महाराष्ट्रातील गुऱ्हाळापेक्षा वेगळी आहे. उसाच्या रसातून मळी वेगळी करण्यासाठी मर्यादित प्रमाणात हैड्रोसचा वापर करण्याऐवजी गुळातील मळी काढण्यासाठी हे उत्पादक सॅफोलाईट या प्रतिबंधित, आरोग्याला घातक असलेल्या रसायनाचा बेसुमार वापर करतात. यामुळे गुळाला आकर्षक रंग येतो. तसेच, गुळाची गोडी वाढावी म्हणून उसाच्या रसात नित्कृष्ट प्रतीची साखर मिसळली जाते. यामुळे गुळाची गोडी व कठीणपणा वाढत असला, तरी अशा साखरमिश्रित उत्पादनामुळे गुळाचे आयुर्वेदिक गुणधर्म नष्ट होतात. गूळ बनवण्याच्या या पद्धतीवर आक्षेप घेण्यात आला असून, याविषयी व्यापारी वर्गानेही अन्न व औषध प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला होता.

‘अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांवर गेल्या आठवड्यात छापे टाकले. यामध्ये जवळपास २१ टन गूळ जप्त केला. दौंडमध्ये गूळ उत्पादकांची जवळपास आठशे गुऱ्हाळे आहेत. या ठिकाणी गुऱ्हाळे स्थानिकांची असली, तरी ती भाडेतत्त्वावर परप्रातीयांना चालवायला देण्यात आली आहेत. प्रत्येक गुऱ्हाळांत किमान एक टन गूळनिर्मि्ती होते. यातील केवळ पाच ते दहा टक्केच गूळ पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी येतो. गुजरातसह इतर राज्यात दौंडमधून गूळ जातो. दौंडमधील बरेचसे अर्थकारणही यावर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांत मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या धसक्याने इथल्या गूळ उत्पादकांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून उसाची कापणीही थांबवण्यात आली असून, जवळपास सर्वच गुऱ्हाळांना टाळे लावण्यात आले आहे. अनेक गूळ उत्पादकांनी घरचा मार्ग धरला आहे,’ अशी माहिती ‘पुणे जॅगरी मर्चंटस असोसिएशन’ने दिली.

  • एकट्या दौंड तालुक्यात आठशेच्या आसपास उत्पादक
  • प्रत्येक गुऱ्हाळात दररोज किमान एक टन उत्पादन
  • दौंड तालुक्यातील उसाच्या रसात ५० टक्क्यांपर्यंत नित्कृष्ट साखरेची भेसळ
  • प्रतिबंधित असलेल्या सॅफोलाईट रसायनाचा बेसुमार वापर
  • बाजार समितीपेक्षा दौंडचा गूळ स्वस्त
  • चामडे उद्योगात सॅफोलाईट रसायनाचा मोठा वापर

कुठलेही रसायन माणसाच्या शरीराला घातक ठरते. हे रसायन आपल्या पचन संस्थेवर, आतड्यांवर परिणाम करू शकतात. हे रासायनिक पदार्थ रक्तात शोषले गेल्यानंतर त्याचा यकृतावर आणि मूत्रपिंडावरही परिणाम होतो. तसेच, पोटातही जळजळ होऊ शकते. गूळ हा नेहमीच्या वापरातला पदार्थ असल्याने अल्सरसारखी गंभीर समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे असा गूळ शरीराला अपायकारकच ठरू शकतो. – डॉ. अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन

खाद्यपदार्थांसाठी अन्न व औषध प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. दौंडमध्ये जे गुळात भेसळ करीत होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, जे भेसळ करीत नाहीत, त्यांनी घाबरण्याची गरज नाही. गूळ बनवणारे असो वा इतर खाद्यपदार्थ बनवणारे असोत, सर्वांनीच नियम आणि मानकांचे पालन करावे. – डी. व्ही. भोगावडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन पुणे</strong>

अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईने बहुतांश गूळ उत्पादकांनी काढता पाय घेतला आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाने काही वर्षांपूर्वी यांना परवानेही दिले होते. या परप्रांतीयांची गूळ बनवण्याची पद्धत पूर्ण वेगळी आणि रसायनमिश्रित आहे. त्यामध्ये अखाद्य रंग आणि सॅफोलाईट रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. वास्तविक अन्न व औषध प्रशासनाने त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. गूळ बनवण्याची प्रमाणित पद्धत सांगणे आवश्यक आहे. असे झाल्यास भेसळीच्या गुळाला मोठ्या प्रमाणावर आळा बसेल. -अजित सेटिया, अध्यक्ष, पुणे जॅगरी मर्चंटस असोसिएशन

भेसळीचा गूळ बनवणाऱ्या उत्पादकांवर यापूर्वीही अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकले होते. जुजबी गूळ जप्त केला जात होता. बऱ्याचदा छापे टाकण्याचा दिखाऊपणाही असायचा. यामध्ये कधीही सातत्य नव्हते. याला स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव आणि दहशतही कारणीभूत होती. म्हणून दुर्लक्ष होत गेले. मात्र, गेल्या आठवड्यातील छापासत्रामुळे भेसळीची पाळेमुळे खणून काढली आहेत, असेच म्हणायला हवे. -मोहन ओसवाल, माजी अध्यक्ष, पूना मर्चंट चेंबर