पुणे : उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या गुळामध्ये गोडवा आणि रंग अधिक आकर्षक दिसावा यासाठी साखरेची भेसळ केल्याचा प्रकार दौंड तालुक्यात उघडकीस आला आहे. अन्न व औषध पुणे प्रशासनाने केलेल्या कारवाईत साडेसोळा टन गूळ आणि २० टन साखरेचा साठा जप्त केला असून, जप्त मालाची एकूण किंमत सुमारे १७ लाख रुपये आहे. या मालाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
प्रशासनाने २९ मे रोजी दौंड तालुक्यातील विविध गूळ उत्पादन आस्थापनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान गुळाचा गोडवा वाढवण्यासाठी त्यामध्ये साखरेचे मिश्रण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय काही ठिकाणी विनापरवाना उत्पादन, ग्राहकांची दिशाभूल करणारे वेष्टन, तसेच प्रशासनाने उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी जी स्वच्छता मानके घालून दिली आहेत त्याचेही उल्लंघन झाल्याचे आढळून आले. अनेक ठिकाणी गुळाची बांधणी नियमानुसार न केल्याचेही निदर्शनास आले. काही ठिकाणी खराब झालेल्या बारदानाचा वापर करण्यात आला होता. बोरी पारधी, सहजपूर आणि खामगाव फाटा परिसरातील गूळ उद्योगांमध्ये या अनियमितता आढळल्या. काही आस्थापनांकडे आवश्यक अन्न सुरक्षा परवानाही नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त दिगांबर भोगावडे यांनी दिली.
गुळ उत्पादक गोडवा वाढवण्यासाठी साखरेची भेसळ करत आहे. वास्तविक गुळ उसाच्या रसापासूनच बनवण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र मजबूत ढेप आणि आकर्षक चकाकी येण्यासाठी साखर आणि कृत्रिम रंगाचा वापर करण्यात आला. त्यामुळे या गुळ उत्पादकांवर ही कारवाई करण्यात आली. भविष्यामध्ये कारवाईची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. – प्रदीप आंबरे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग
