पुणे : दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे २८ ते ३० मे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात येणार आहे.
या ब्लॉकमुळे २७ ते २९ मे दरम्यान धावणारी अमरावती-पुणे एक्स्प्रेस, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, झाशी-हडपसर स्पेशल गाडी, हडपसर-झाशी स्पेशल, पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे गाडी रद्द करण्यात आली आहे. तर, २६ ते ३० मे दरम्यान धावणारी हावडा-पुणे एक्स्प्रेस, हडपसर-बनारस एक्स्प्रेस, जम्मू तवी-पुणे एक्स्प्रेस, निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस, हडपसर-नांदेड एक्स्प्रेस, नांदेड-हडपसर एक्स्प्रेस, केएसआर बेंगळुरू-नवी दिल्ली एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, हुबली-निजामुद्दीन एक्स्प्रेस, पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस, निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.
पुणे-गोरखपूर विशेष आणि हडपसर-मुझ्झफ्फरपूर विशेष गाडी ८ तास उशिरा, पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस आणि पुणे-दानापूर विशेष गाडी 3 तास उशिरा, तर हडपसर-रेवा एक्सप्रेस २ तास उशिरा सोडण्यात येणार आहे. तसेच पुणे-दानापूर स्पेशल, दानापूर-हडपसर स्पेशल, निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस, लखनऊ-पुणे, ऋषिकेश-हुब्बल्ली, कर्नाटक-एसबीसी राजधानी एक्सप्रेस, मैसूरु-हज़रत निज़ामुद्दीन स्वर्ण जयंती एक्स्प्रेस उशिराने धावणार आहेत.
दरम्यान, प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला किंवा ‘एनटीईस’ ॲपवरून आपल्या गाडीचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे-जबलपूर-पुणे विशेष गाडी नियमित
पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणारी जबलपूर-पुणे विशेष गाडी आता ‘साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस’ म्हणून धावणार आहे. ही गाडी दर रविवारी दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी जबलपूर स्थानकातून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळई सहा वाजून 25 मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे. तर, दर सोमवारी सकाळी अकरा वाजून २० मिनिटांनी ही गाडी पुणे स्थानकातून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी सहा वाजता जबलपूरला पोहोचेल.
या गाडीला मदन महल, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, बऱ्हाणपूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाइन हे थांबे आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा एनटीइस ॲपवर गाडीचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
