पुणे : दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी दौंड पंचायत समिती ही तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून घेऊन पहिल्यांदाच सत्ता काबीज केली आहे. या समितीच्या सभापतिपदी भाजपचे सुखदेव चोरमले आणि उपसभापतिप अमृता गिरमकर यांची वर्णी लागली आहे.
या पंचायत समितीच्या १४ जागांपैकी भाजपला आठ आणि‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सहा सदस्य निवडून आले. पहिल्यांदाच या पंचायत समितीत भाजपला यश मिळाले. सभापतिपदासाठी भाजपकडून सुखदेव चोरमाले, तर ‘राष्ट्रवादी’कडून प्रवीण दिवेकर यांनी, तर उपसभापतिपदासाठी भाजपच्या अमृता गिरमकर आणि ‘राष्ट्रवादी’च्या मनिषा ताकवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, दिवेकर आणि ताकवणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चोरमले आणि गिरमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चोरमले हे खामगाव गणातून विजयी झाले आहेत. गिरमकर या देऊळगाव राजे गणातून निवडून आल्या आहेत.
भाजपने ‘राष्ट्रवादी’बरोबर युती टाळली
दौंडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. भाजपचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात कायम लढत होत आली आहे. पंचायत समितीत महायुतीतील हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्तेचा वाटा विभागून घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांमध्ये समेट घडून आला नाही. भाजपकडे संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी ‘राष्ट्रवादी’ला सत्तेत वाटेकरू घेण्यास नकार दिला. त्यांनी ‘राष्ट्रवादी’बरोबर युती करणे टाळल्याने भाजपच्या हाती ही पंचायत समिती गेली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार कुल आणि माजी आमदार थोरात यांच्यातील राजकीय वाद उफाळून आला होता. माजी आमदार थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केडगाव-बोरीपारधी गटातून उभे होते. त्यांच्याविरोधात भाजपने उमेदवार उभा केला. मात्र, तुषार थोरात हे विजयी झाले. त्यामुळे आमदार राहुल कुल यांच्यावर नामुष्की ओढवली. कुल आणि थोरात यांच्यात मनोमीलन न झाल्याने या पंचायत समितीवर त्याचे पडसाद उमटले. पंचायत समितीत भाजपला दोन जागा जास्त मिळाल्याने या समितीवर भाजपची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले. भाजप ही ‘राष्ट्रवादी’बरोबर युती करणार का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, भाजपकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ला या समितीवरून पायउतार व्हावे लागले आहे.
