महाराष्ट्रातील चित्रपटनिर्मितीचे केंद्र मुंबई हेच समजले जात असले तरी आता ते हळूहळू इतर शहरात पसरू लागले आहे. पुणे, कोल्हापूर आणि इतरही ठिकाणी मराठी चित्रपटांची निर्मिती होते. चित्रपटांमधील गाण्यांच्या ध्वनिमुद्रणापासून ‘फायनल मिक्सिंग’पर्यंत ध्वनियोजनेशी संबंधित सर्व कामे आता पुण्यात होऊ लागली आहेत. मुंबई वगळता राज्यात ‘डॉल्बी’ या कंपनीची मान्यता असलेला पहिला स्टुडिओ म्हणजे पुण्यातील ‘डॉन स्टुडिओ’. मुंबई सोडून इतर ठिकाणी बनणाऱ्या मराठी चित्रपटांना या स्टुडिओने आवाजाशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी एक भक्कम पर्याय दिला आहे.
एखादा चित्रपट घडताना तो किती वेगवेगळ्या टप्प्यांमधून जात असतो याची कल्पना प्रेक्षकांना चित्रपट पाहताना सहसा येत नाही. ‘प्री- प्रॉडक्शन’ (उदा. चित्रपटातील गाण्यांचे ध्वनिमुद्रण) आणि ‘पोस्ट प्रॉडक्शन’ (म्हणजे चित्रपटाचे छायाचित्रण झाल्यानंतर केले जाणारे आवाजाचे ‘डबिंग’, ‘मिक्सिंग’, चित्रणाचे ‘कलर करेक्शन’ वगैरे) हे त्यातील दोन खूप महत्त्वाचे टप्पे. ही कामे करण्यासाठी मुंबईला जावे लागणार नाही, अशी सोय पुण्यातील एका स्टुडिओने या क्षेत्रात उपलब्ध करून दिली आहे. हा आहे संगीतकार नरेंद्र भिडे यांचा ‘डॉन स्टुडिओ’ (dawn studio) या स्टुडिओचे वैशिष्टय़ असे की ‘डॉल्बी’ या कंपनीची मान्यता असलेला तो मुंबईबाहेरचा राज्यातील पहिला स्टुडिओ आहे.
भिडे हे स्वत: प्रसिद्ध संगीतकार आणि ध्वनियोजनाकार. त्यांनी २००७ मध्ये आपल्या राहत्या घराजवळ छोटय़ा सदनिकेत एक स्टुडिओ सुरू केला. या स्टुडिओमध्ये संगीताचे रेकॉर्डिग होत असे. चित्रपटांचे ‘डबिंग’ देखील तिथे सुरू झाले. स्टुडिओ लहान पडू लागल्यानंतर २००९ मध्ये त्यांनी कर्वेनगरमध्ये एका बंगल्यात स्टुडिओ सुरू करण्याचे ठरवले. पुढची चार वर्षे तिथे काम चालले. परंतु ‘फॉली’ आणि चित्रपटांचे ‘फायनल मिक्सिंग’ या कामांची सोय पुण्यात होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चित्रपटांचे छायाचित्रण करताना आजूबाजूच्या आवाजांसह ध्वनिमुद्रण झालेले असते. नंतर ध्वनिमुद्रित आवाज पुसून परत ‘डबिंग’ करून चित्रपटाला नव्याने आवाज दिला जातो. हे करताना चित्रपटाच्या संवादांबरोबर मुद्रित झालेले इतर लहान-लहान आवाजही पुसले जातात. चालताना येणारा पावलांचा आवाज, वाहनांचे आवाज असे सगळे आवाज मग पुन्हा जसेच्या तसे तयार करावे लागतात. ‘साऊंड डिझायनिंग’मधील या प्रकाराला ‘फॉली’ म्हणतात. पूर्वी तेवढय़ासाठी मुंबईत जावे लागत होते. चित्रपटगृहात बसून चित्रपट पाहताना प्रत्यक्षात प्रेक्षकाला त्यातील आवाज कसा येईल, याचा अंदाज लहानशा स्टुडिओमध्ये येऊ शकत नाही. चित्रपटगृहामधील अनुभवासाठी आवाजाचे ‘फायनल मिक्सिंग’ करणारे थिएटर देखील पुण्यात नव्हते. थिएटरची लांबी, रुंदी, उंची काय असावी, तिथे आवाज कसा घुमतो अशा विविध गोष्टींसाठी काही नियम डॉल्बी या कंपनीने निश्चित केले आहेत. मुंबईच्या बाहेर ‘डॉन’ने प्रथम ही मान्यता मिळवली आणि अनेक मराठी चित्रपटांचे ‘फायनल मिक्सिंग’ पुण्यात होऊ लागले. ‘डीआय’ (डिजिटल इंटरमिजिएट) नावाचे एक तंत्र आहे. यात प्रामुख्याने चित्रित भागाच्या ‘कलर करेक्शन’चा समावेश होतो. पडद्यावर दिसणारा चित्राचा नको असलेला भाग वगळणे, रंगांमध्ये सुधारणा करणे या गोष्टी ‘डॉन’मध्ये सुरू झाल्या आहेत.
एलिझाबेथ एकादशी, कटय़ार काळजात घुसली, ख्वाडा, कासव, रमा-माधव, काकस्पर्श, रंगा-पतंगा, दशक्रिया, लेथ जोशी, चि. व चि. सौ. कां. अशा अनेक चित्रपटांचे ध्वनिमुद्रण, डबिंग, मिक्सिंग अशी वेगवेगळी कामे पुण्यात ‘डॉन’मध्ये झाली आहेत. विशेष म्हणजे या विविध कामांसाठी राज्याबाहेरूही चित्रपट पुण्यात येऊ लागले आहेत. ‘बे यार’ या गुजराती चित्रपटाचे नाव त्यात घ्यावे लागेल.
‘बरीच प्रॉडक्शन हाऊस पुणे, कोल्हापूरमध्ये आहेत. मुंबईत येणे-जाणे, तिथे राहणे आणि प्रत्यक्ष खर्च जमेस धरता चित्रपटांच्या ‘पोस्ट प्रॉडक्शन’ची ही कामे पुण्यात कमी खर्चात होतात,’ असे भिडे सांगतात. ‘डॉल्बीच्याही पुढचे ‘डॉल्बी अॅटमॉस’ नावाचे एक तंत्र आहे. सर्व चित्रपटगृहांमध्ये अद्याप त्याची सोय नाही. यात चित्रपटगृहाच्या केवळ डाव्या व उजव्या भिंतीतून नव्हे, तर डोक्यावरून छतामधूनही आवाज येईल अशी सोय केलेली असते. आपल्याकडे हे तंत्र रुळायला थोडा वेळ लागू शकेल, परंतु ते येणार हे ओळखून आम्ही त्या दृष्टीने ‘डॉन’ स्टुडिओमध्ये प्राथमिक सोय करून ठेवली आहे,’ असेही ते आवर्जून नमूद करतात.
sampada.sovani@expressindia.com