परवाना शुल्कवाढ व इतर प्रश्नांवर वाहतूकदारांच्या विविध संघटनांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये रिक्षा संघटनांनीही सहभाग घेतला असून, या संघटनांकडून आपापल्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात दोन वेगवेगळ्या संघटनांकडून बंदची शर्यत सुरू आहे. एका संघटनेचा बंद ४ मार्चला, तर त्यानंतर केवळ तीनच दिवसांच्या अंतराने ८ मार्चला दुसऱ्या संघटनेकडून बंद पुकारण्यात आला आहे. शासन दरबारी प्रश्न मांडण्यासाठी हा बंद असला, तरी संघटनांतील समन्वयाअभावी पुणेकरांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागण्याची चिन्ह आहेत.
राज्य शासनाने माल व प्रवासी वाहतुकीतील वाहनांच्या परवाना व नूतनीकरण शुल्कामध्ये वाढ केल्याच्या पाश्र्वभूमीवर विविध वाहतूकदार संघटनांकडून सध्या आंदोलन करण्यात येत आहे. शरद राव अध्यक्ष असलेल्या रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीनेही या प्रश्नाबरोबरच अवैध प्रवासी वाहतुकीवर र्निबध तसेच रिक्षा चालकांच्या विविध मागण्या घेऊन आंदोलन सुरू केले आहे. याच प्रश्नात संघटनेने १५ जानेवारीला मुंबईमध्ये रिक्षा बंद केला होता. त्यानंतर संघटनेने पुण्यात बैठक घेतली व ४ मार्चला रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे परवाना शुल्कवाढीच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, बस, टँकर वाहतूक महासंघानेही विविध पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. संघटनेने ८ मार्चला संपूर्ण राज्यभर प्रवासी व माल वाहतुकीतील वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघामध्ये पुण्यातील काही रिक्षा संघटनांचाही सहभाग आहे. त्यामुळे राज्यातील व शहरातील बंदमध्ये रिक्षांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे ४ तारखेला एकाचा, तर ८ मार्चला दुसऱ्याचा रिक्षा बंद होणार आहे. विशेष म्हणजे शरद राव यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची पुण्यात बैठक झाली असताना महासंघाची काही मंडळीही तेथे उपस्थित होती. राव यांच्या संघटनेने ४ मार्चला बंद जाहीर केल्यानंतर महासंघाने राज्यव्यापी बैठकीत ८ मार्चच्या बंदची निश्चिती केली.
शासन दरबारी प्रश्न मार्गी लागण्यासाठी संघटनांनी समन्वय ठेवण्याची गरज असताना आपापल्या संघटनांची शक्ती दाखविण्यासाठी वेगवेगळ्या दिवशी बंद ठेवण्याच्या प्रकारातून प्रवाशांनाच वेठीस धरण्याचा प्रकार होत असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ८ मार्चला बंद करूनही प्रश्न न सुटल्यास १५ मार्चपासून बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे. परवाना शुल्कवाढीच्या प्रश्नावर रिक्षा पंचायतीने आंदोलन केले असले, तरी अद्याप बंदबाबत भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता रिक्षा पंचायतीच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.