पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुकमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी सराफी पेढीतील पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने भर दिवसा लुटले. सराफी पेढीतील महिलेला चोरट्यांनी मारहाण केली. या घटनेत महिला जखमी झाली.
वडगाव बुद्रुकमधील बाजारपेठेत ही घटना घडल्याने घबराट उडाली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. याबाबत मंगल शंकर घाडगे (रा. सदाशिव दांगटनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.घाडगे यांची वडगाव बुद्रुकमधील रेणुकानगरमध्ये गजानन ज्वेलर्स सराफी पेढी आहे. घाडगे आणि त्यांचे पती शंकर यांनी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पेढी उघडली. शंकर कामानिमित्त पेढीतून बाहेर पडले. त्या वेळी मंगल एकट्याच पेढीत होत्या. दुपारी दीडच्या सुमारास दुचाकीवरून आलेले तीन चोरटे पेढीत शिरले. चोरट्यांनी त्यांचे चेहरे रुमालाने झाकले होते. एका चोरट्याकडे पिस्तूल होते.
मंगल यांना पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर शोकेसमधील पाच सोनसाखळ्या आणि सुवर्णहार असा पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. घाडगे यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली.चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत मंगल यांच्या डोक्याला दुखापत झाली. सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरटे वाहन क्रमांकाची पाटी नसलेल्या दुचाकीवरून पसार झाल्याचे दिसते. पसार होताना एका चोरट्याने पिस्तूल उगारून दहशत माजविल्याचे उघड झाले आहे. एका मोटारीतील कॅमेऱ्याने चोरट्यांना टिपले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरोडाप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर दिवसा सराफी पेढीवर दरोडा घालणाऱ्या चोरट्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.- संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन