पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे आवाहन राजकीय पक्षांना केले आहे. आता प्रत्यक्ष चर्चा करण्यात येईल. पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठीच प्रयत्न करण्यात येतील, असे भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्रीदवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
हेही वाचा >>> पुणे : अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो – देवेंद्र फडणवीस
कसब्याचा उमेदवार कोण हे लवकर समजेल असेही ते म्हणाले. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी स्वत: चर्चा करणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, भाजप उमेदवाराच्या नावाची घोषणा दिल्लीतून होईल. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांना आवाहन करणार आहे. याआधीही केलेले आहे. यानंतर प्रत्यक्ष जाऊन मी चर्चाही करणार आहे. त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे.