dcm devendra fadnavis attended bhakti utsav mahasatsang event of spiritual guru sri sri ravi shankar pune print news ccp 14 | Loksatta

पुणे : अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

अध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांच्या भक्ती उत्सव-महासत्संग कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी हजेरी लावली.

dcm devendra fadnavis attended bhakti utsav mahasatsang event of spiritual guru sri sri ravi shankar

अध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांच्या भक्ती उत्सव-महासत्संग कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी हजेरी लावली. पुण्यातील कोथरूड येथे झालेल्या या कार्यक्रमात सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला.

पुणे हे बुद्धी अणि विद्येचे माहेरघर असल्याने इथे अथर्वशीर्षाचे पठण होणे स्वाभाविक आहे. अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विज्ञानासह अध्यात्म हा श्री श्री रविशंकर यांच्या विचारांचा गाभा आहे. या विचारांमुळेच जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेली अत्यंत प्राचीन सभ्यता म्हणून भारताकडे पाहिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : ‘ससून’च्या प्रत्येक विभागामध्ये पाच खाटांचा अतिदक्षता विभाग

 सामूहिक अथर्वशीर्ष पठणाच्या या विक्रमाचे प्रमाणपत्र एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या डॉ. चित्रा आणि वर्ड बुक ऑफ लंडनचे डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते  श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार भीमराव तापकीर, शहाजी पाटील, उद्योगपती अनिरुद्ध देशपांडे, सूर्यकांत काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विशाल गोखले आदी उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून अनेक लोकांचे जीवन सुधारत असताना सामाजिक दायित्वही श्री श्री रविशंकर यांनी आपल्याला शिकवले. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि महाराष्ट्रातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी केले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग अग्रेसर होती. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले. शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून  देण्याचे हे अतुलनीय कार्य आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 22:08 IST
Next Story
पुणे : ‘ससून’च्या प्रत्येक विभागामध्ये पाच खाटांचा अतिदक्षता विभाग