पुणे : अवकाशातील दोन ‘मृत’ ताऱ्यांच्या एक विलक्षण जोडीचा शोध भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका पथकाने लावला आहे. या दोन्ही मृत ताऱ्यांचे अवशेष अवघ्या सहा मिनिटांत एकमेकांभोवती एक फेरी पूर्ण करीत असून, त्यांची कक्षा अत्यंत वेगाने आकुंचन पावत आहे. त्यामुळे मृत ताऱ्यांची ही जोडी भविष्यात अवकाशातील गुरुत्वीय लहरी शोधण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा स्रोत ठरू शकते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राने (आयुका) या बाबतची माहिती दिली. आयुकातील डॉ. राहुल शर्मा, प्रा. चांद्रेयी मैत्रा यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ या संशोधनपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. ‘ईआरएसएसयू जे०६०८’ या नावाने ओळखली जाणारी ही जोडी श्वेत बटू ताऱ्यांची आहे.

‘सूर्याप्रमाणे ताऱ्यांचे इंधन संपल्यानंतर त्यांच्या मागे उरलेला अत्यंत दाट गाभा म्हणजे श्वेत बटू. या दोन्ही ताऱ्यांमधील अंतर अत्यंत कमी असून, ते एकमेकांभोवती अवघ्या ३७४ सेकंदांत फिरतात. ई रोझिटा (एक्स्टेंडेड रोएंटजेन सर्व्हे विथ ॲन इमेजिंग टेलिस्कोप ॲरे) या क्ष किरण अवकाश दुर्बिणीच्या सर्वेक्षणातून या तारकीय जीवाष्म जोडीचा शोध लागला. त्यानंतर चीनच्या आइन्स्टाउन प्रोब मोहिमेतील निरीक्षणे, नासाच्या न्यूट्रॉन स्टार इंटेरिअर कम्पोझिशन एक्स्प्लोरर दुुर्बिणीची माहिती, एक्सएमएम न्यूटन दुर्बिणीच्या निरीक्षणांचा एकत्रित अभ्यास करण्यात आला. सुमारे साडेतीन वर्षांच्या अभ्यासातून या ताऱ्यांची कक्षा अत्यंत वेगाने कमी होत असल्याचे स्पष्ट झाले,’ असे आयुकाने नमूद केले.

गुरुत्वीय लहरींमुळे कमी झालेली ऊर्जा हे मृत ताऱ्यांच्या कक्षेच्या आकुंचनाचे प्रमुख कारण असावे, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. गुरुत्वीय लहरी म्हणजे अवकाशकाळात निर्माण होणाऱ्या सूक्ष्म लहरी. या द्वैती प्रणालीची कक्षा जितक्या वेगाने आकुंचन पावते, तितक्या शक्तिशाली गुरुत्वीय लहरी निर्माण होण्याची शक्यता असते. या जोडीतील एका ताऱ्यापासून दुसऱ्या ताऱ्याकडे पदार्थ थेट वाहत जाऊन त्याच्या पृष्ठभागावर आदळत असल्याचेही मानले जाते. या प्रक्रियेमुळे दहा लाख अंशांहून अधिक तापमान निर्माण होऊन तीव्र एक्स-रे किरणोत्सर्ग होतो. या वैशिष्ट्यांमुळे ‘ईआरएसएसयू जे ०६०८’ ही भविष्यातील लेजर इंटरफेरोमीटर स्पेस अँटेनासारख्या (लिसा) अवकाशातील गुरुत्वीय लहरी शोधकांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रणाली ठरू शकते. अपेक्षित गुरुत्वीय लहरींचे संकेत आधीच अचूकपणे भाकीत करता येत असल्याने भविष्यात लिसाच्या निरीक्षणांची पडताळणी करण्यासाठी ही प्रणाली एक महत्त्वाचा स्रोत ठरू शकते, अशी माहिती आयुकाने दिली.

‘ईआरएसएसयू जे०६०८’ प्रणाली ही अत्यंत वेगळी प्रणाली आहे. सर्वांत सधन ताऱ्यांच्या द्वितारा उत्क्रांतीतील एक टप्पा समजून घेण्यासाठी अशी प्रणाली एखाद्या नव्या प्रयोगशाळेप्रमाणे आहेत.- डॉ. राहुल शर्मा, शास्त्रज्ञ

‘ईआरएसएसयू जे०६०८’ ही सध्या ज्ञात असलेल्या अत्यंत सघन श्वेत बटू द्वितारा प्रणालींपैकी सर्वांत प्रचंड आणि वेगाने उत्क्रांत होणारी प्रणाली असू शकते. याच्या कक्षेत वेगाने होणाऱ्या बदलांमुळे भविष्यातील गुरुत्वीय-लहरी वेधशाळांसाठी हा एक आशादायक स्रोत ठरू शकेल.- प्रा. चांद्रेयी मैत्रा, शास्त्रज्ञ