पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी ८ ऑगस्टपर्यंत संधी आहे. प्रवेश प्रक्रियेत अद्याप ५० हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २३ ते ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत ३९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यानंतर ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सोमवार सायंकाळपर्यंत ५३ हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. हेही वाचा - Pune : लोकांना घाबरवण्यासाठी रेस्तराँमध्ये गोळीबार, मुळशीतला बांधकाम व्यावसायिक गजाआड हेही वाचा - Video: “एकनाथ काका आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या”, घरात पाणी शिरल्याने चिमुकल्याची मुख्यमंत्र्यांना साद ‘आरटीई प्रवेश प्रक्रियेत अद्याप कमी प्रवेश झाले आहेत. तसेच राज्यातील पावसाची स्थिती आहे. त्यामुळे प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे,’ असे गोसावी यांनी स्पष्ट केले.