पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे पैज लावणं एकाच्या जीवावर बेतलं आहे. ‘कोणाला जास्त पोहायला येतं, इंद्रायणी नदीपात्र कोण लवकर ओलांडतं’, या पैजेत संतोष संभाजी जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. नदीपात्र ओलांडत असताना संतोष जाधव या तरुणाला दम लागला आणि तो नदीत वाहून गेला. यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष संभाजी जाधव हा मेडिकलमध्ये औषधांचा पुरवठा करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता. १३ एप्रिल रोजी डीलरच्या मुलाचा वाढदिवस होता. त्याची पार्टी रविवारी ठेवण्यात आली. संतोष त्याच्या मदतनीसासोबत गेला. त्यांची इंद्रायणी नदीकाठी त्यांनी मद्यपान केलं.

मद्यपानानंतर नदीपात्र ओलांडण्याची पैज

मद्यपानानंतर संतोष आणि त्याच्या गाडीवर असणारा मदतनीस या दोघांमध्ये नदीपात्र ओलांडण्याची पैज लागली. तुला पोहता येत नाही, कोण अगोदर नदीपात्र पार करतं असं त्यांच्यात बोलणं झालं आणि पैज लागली. संतोष आणि मदतनीस यांनी नदीमध्ये उडी घेतली. दोघे पैज जिंकायच्या उद्देशाने पोहत होते.

हेही वाचा : बेदम मारहाण करत जमिनीवर नाक घासायला लावलं, पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

दरम्यान, अर्ध्या नदी पात्रात जाताच संतोषला दम लागला आणि तो वाहून गेला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. २५ तासांनी त्याचा मृतदेह हाती लागला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिली.