‘फ्रेंडशिप डे’ची दशकपूर्ती

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

प्रतिनिधी, पुणे

मैत्रीला वयाचे बंधन नसते याची प्रचिती देत महाविद्यालयीन युवक-युवतींनी त्यांच्या आजी-आजोबांच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकांशी असलेल्या मैत्रीची शनिवारी दशकपूर्ती साजरी केली. ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने आलेल्या युवा पिढीने दाखविलेली आपुलकी पाहून ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांद्वारे आभासी मित्र बनविण्यापेक्षा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना मित्र बनविण्याची किमया युवकांनी  साधली.

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या ५५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मातोश्री वृद्धाश्रमामध्ये भेट देऊन वयाने ज्येष्ठ असलेल्या नव्या मित्रांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.  त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यामध्ये दीड तास कसा निघून गेला हे युवा पिढीच्या प्रतिनिधींना समजले नाही.

सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजी-आजोबांचे संस्कार, निरागस प्रेम अशी योग्य शिकवण युवा पिढीला मिळावी आणि आपल्या सहवासासाठी कोणी तरी आसुसलेले आहेत, ही गोष्ट ज्येष्ठ नागरिकांच्या ध्यानात यावी या उद्देशातून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी फ्रेंडशिप डेनिमित्त वृद्धाश्रमाला भेट देतात. संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, प्राचार्या वर्षां शर्मा, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे, प्रशांत शिंदे या वेळी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Decade of friendship day

ताज्या बातम्या