पुणे : खराडीत मुळा-मुठा नदीपात्रात शिर धडावेगळे केलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला. तरुणीचे हात, पाय तीक्ष्ण शस्त्राने कापून टाकण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून आता अवयवांचा शोध घेण्यात येत आहे. नदीपात्रात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. पाणबुड्यांची मदतही घेण्यात येणार आहे.
खराडीतील नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला. तरुणीचे शिर धडावेगळे करून मृतदेह खराडी येथे नदीपात्रात टाकून दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. तरुणीची ओळख पटलेली नाही. तिचे शिर धडावेगळे करण्यात आले. तिचे हात, पाय तीक्ष्म शस्त्राने कापून टाकण्यात आले आहेत. अवयवांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मोहीम राबविण्यात येणार आहे. नदीपात्राचा १०० किलोमीटरचा परिसर पिंजून काढण्यात येणार आहे. त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे, तसेच पाणबु्डयांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
हेही वाचा…मूर्ती आमची, किंमत तुमची! वाचा कुठे आहे ‘हा’ उपक्रम
खडकवासला धरण साखळीत पाऊस सुरू असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्यात आल्याने शोधकार्यात अडचण आली आहे. नदीपात्रातील घाटांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणींची माहिती घेण्यात येत आहे. खून झालेल्या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० वर्ष आहे. खून प्रकरणात पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नाहीत. पोलिसांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला आहे. तरुणीचा मृतदेह खडकवासला परिसरातून वाहून आल्याची शक्यता आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा…राजकोट पुतळा घटनेच्या निषेधार्थ पुण्यात अजित पवार गटाकडून मूक आंदोलन
चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चंदननगर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे. तपासाबाबतची माहिती त्यांनी घेतली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर मृतदेह नदीपात्रात टाकून दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.