पुणे : डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित ‘भारतविद्या’ हा पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी पहिल्या टप्प्यात दोन वर्षांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजूर केला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. ‘भारतविद्या’ हा राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार संरेखित केलेला आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली, प्राचीन भारताचा इतिहास, शास्त्रीय भाषा परंपरा, मंदिर वास्तुकला, भाषा शास्त्र, संस्कृतीचा समावेश आहे. भारतीय आणि पाश्चात्य ज्ञान चौकटींना या अभ्यासक्रमातून एकाच सुसंगत शिक्षणात आणण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार १२० श्रेयांकांसह ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी, १६० श्रेयांकांसह ४ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर ऑनर्स, २०० श्रेयांकांसह ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदव्युत्तर पदवी प्राप्त होणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
संबंधित अभ्यासक्रमाचा प्रकल्प विशिष्ट कालावधीसाठी असल्याने त्या अंतर्गत अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने नव्याने पदनिर्मिती न करता आवश्यकतेनुसार प्रकल्प कालावधीपर्यंत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, शासनाकडून मंजूर करण्यात आलेला निधी ज्या प्रयोजनार्थ आहे, त्याच प्रयोजनासाठी निधी खर्च खर्च करण्यात आला आहे, हे पाहण्याची जबाबदारी विद्यापीठाचे कुलसचिव यांची असेल. निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र आणि तपशीलवार खर्चाची माहिती उच्च शिक्षण संचालनालयामार्फत शासनास सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतविद्या अभ्यासक्रमासाठी १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्यास तो लगेच सुरू करण्याचा मानस आहे. त्याशिवाय ‘आभा’ संकल्पनेंतर्गत राज्यातील अन्य विद्यापीठांना बरोबर घेऊन प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात येणार आहे. – डॉ. भूषण पटवर्धन, कुलपती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ
