पुणे : डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्ता परिसरात असलेल्या एका हॉटेलच्या आवारात रीलस्टार तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनेनंतर कायदेशीर बाबींची तपासणी केल्यानंतर संबंधित हाॅटेल उघडण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्ता परिसरात असलेल्या एका हाॅटेलच्या आवारात रीलस्टार तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक करण्यात आली. तसेच, एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले.
या घटनेची गंभीर दखल डेक्कन पोलिसांनी घेतली आहे. ‘मध्यरात्रीपर्यंत हाॅटेल सुरू ठेवण्यात येत असल्याने नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. संबंधित हाॅटेल एका बंगल्याच्या आवारात सुरू केल्याने कायदेशीर बाबी तपासण्यासाठी पोलिसांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे,’ अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली.‘या प्रकरणातील जखमी तरुण आणि एक तरुणी हे दोघे ‘रीलस्टार’ आहेत. साताऱ्यातील कासपठार येथे मोटार पुढे नेण्याच्या कारणावरून (ओव्हरटेक) त्यांच्यात वाद झाला होता.
गेले वर्षभर त्यांच्यात वाद सुरू होते. १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री या प्रकरणात जखमी झालेला तरुण डेक्कन जिमखाना भागातील हाॅटेलमध्ये आला होता. त्या वेळी रीलस्टार तरुणीने साथीदारांना बोलावून घेतले. तरुणाला मारहाण करण्यात आली. तसेच, एकाने तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे,’ असे पोलीस उपायुक्त रावले यांनी सांगितले.
