scorecardresearch

पुणे: कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना मुदतवाढ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकाळ संपुष्टात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या काही सदस्यांना आणखी काही काळ विद्यापीठात काम करता येणार आहे.

पुणे: कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना मुदतवाढ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकाळ संपुष्टात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या काही सदस्यांना आणखी काही काळ विद्यापीठात काम करता येणार आहे. विविध विषयांसाठी नियुक्त केलेल्या समित्यांचे कामकाज अद्यापही सुरू असल्याने संबंधित सदस्यांना मुदतवाढ देण्याची तजवीज विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>घोडबंदर मार्गावर अवजड वाहतूक मध्यरात्री बंद; मेट्रोच्या कामामुळे वाहतूक बदल लागू

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. मात्र विविध विषयांसाठी नियुक्त केलेल्या समित्यांचे कामकाज अद्यापही सुरू असल्याने समित्यांचे कामकाज संपुष्टात येईपर्यंत किंवा नवीन समिती नियुक्त करेपर्यंतच्या कालावधीसाठी संबंधित समिती प्रशासनाच्या विनंतीनुसार कार्यरत राहणार असल्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने २९ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत केल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची शनिवारपासून तिकीटविक्री

विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पदवीधर, प्राचार्य गटाच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. संस्थाचालक गटाची निवडणूक बिनविरोध झाली. आता अधिसभा अस्तित्त्वात आल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्याशिवाय राज्यपालांकडून काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने विद्यापीठातील काही विषयांबाबत नेमलेल्या समित्यांचे कामकाज तत्कालीन सदस्यांच्या समित्यांमार्फतच पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 19:26 IST

संबंधित बातम्या