पुणे : राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडून २५६ कोटी रुपये दुग्धविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. पुढील आठवडाभरात राज्यातील सुमारे साडेसात लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध अनुदान जमा होणार आहेत.दुग्धविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात राज्य सरकारकडून २५६ कोटी रुपये दुग्धविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. राज्यभरातील दूध संघांनी गाईच्या दूधउत्पादक शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर भरणे सुरू केले आहे. कागदोपत्री तयारी पूर्ण होताच दूध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.

राज्यात ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीसाठी दिलेल्या अनुदान वितरणासाठी तीन शेतकऱ्यांच्या १२ लाख गाईंच्या दुधाला २३८ कोटी रुपयांचे अनुदान वितरण केले होते. गाईंची संगणकीकृत नोंदणी (टॅगिंग) करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. पुढील आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होईल. राज्य सरकारने अनुदानासाठी एकूण ५४६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यांपैकी २५६ दुग्धविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. लाभार्थी वाढल्यामुळे आणखी निधी लागल्यास सरकारकडून मिळवून वितरित केला जाईल. या वेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. मागील अनुदानाच्या वेळी राज्यभरातून ५६० दूध संघांनी दूधउत्पादकांची माहिती संकेतस्थळावर भरली होती. या वेळी ६९० दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती भरणे सुरू केले आहे, अशी माहितीही दुग्धविकास विभागातून देण्यात आली.

हेही वाचा >>>पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा शनिवारी

नगर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी

राज्यात खासगी आणि सहकारी असे एकूण ८१७ दूध संघ आहेत. त्यांपैकी ६९० दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती भरणे सुरू केले आहे. अद्यापही १२७ संघानी माहिती भरलेली नाही. गाईच्या दूध अनुदानासाठी माहिती भरलेल्या राज्यातील ५९० दूध संघांना दूध घालणारे एकूण ७ लाख ६४ हजार ६९८ शेतकरी पात्र असून, त्यांच्याकडील २७ लाख ९ हजार ८२५ गाईंची तपासणी पूर्ण झाली आहे. राज्यात नगर जिल्हा दूध अनुदानाचा सर्वांत मोठा लाभार्थी आहे. मागील एकूण २३८ कोटी रुपयांच्या अनुदानापैकी ९२ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठीही नगर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी सर्वाधिक आहेत. दूध उत्पादकांची माहिती भरणाऱ्या ६९० दूध संघांपैकी १६० दूध संघ एकट्या नगर जिल्ह्यातील असून, त्यांना सुमारे २०० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात दूध अनुदान जमा होईल. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. राज्यातील सर्व दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर तत्काळ भरावी. एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, अशी माहिती दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे.