सामाजिक संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारागृहात प्रवेश देण्याचा निर्णय कारागृह विभागाकडून घेण्यात आला आहे. मानवी वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक संशोधनाचा वापर केला जातो. विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विधी आणि समाजकल्याण अभ्यासक्रमासाठी कारागृहास भेट देतात. विविध विषयावर महाराष्ट्रातील तसेच देशातील विद्यापीठांमार्फत संशोधन करण्यात येते.
हेही वाचा >>>मटण खाऊन देवदर्शन केल्याचा विजय शिवतारेंचा आरोप; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “यासंदर्भात मी…”
कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी कारागृहात संशोधनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कारागृहात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला आहे. नोंदणीकृत संस्था, शासनमान्य विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृह भेटीची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, काही आक्षेपार्ह विषय वगळता अन्य बाबींवर संशोधन करता येणार आहे. काही अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयातील जास्तीत जास्त ३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेटीची परवानगी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा >>>VIDEO: गोष्ट पुण्याची- पिंपळाच्या झाडाने वेढलेलं वैशिष्ट्यपूर्ण ‘झाकोबा मंदिर’
कारागृहात कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. समाजकार्य विषयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कारागृहास भेट देण्याची संधी उपलब्ध करुन देणयात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती उपलब्ध होईल. विधी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कारगृह भेट मार्गदर्शक ठरणार आहे. कारागृहातील कैद्यांना कायदेविषय सहाय्य तसेच विधी व्यवसाय करतान त्यांना भविष्यात फायदा होऊ शकतो.कैद्यांच्या समस्या, मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यात येतो. टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ,ससून सर्वोपचार रुग्णालय या संस्था कैद्यांवर संशोधनात्मक अभ्यास करणार आहेत. महाराष्ट्रातील कैद्यांना भेडसावणाऱ्या समस्या, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर तपशीलवार संशोधन कारागृह विभागाच्या समन्वयाने करता येणार आहे. प्रत्यक्ष भेटीमुळे कारागृहातील अनेक सकारात्मक बाबी समाजासमाेर येतील. संशोधनामुळे उपलब्ध होणाऱ्या अहवालांमुळे सुधारणात्मक बदल घडविण्यास मदत होईल तसेच कैद्यांच्या विविध समस्या जाणून घेता येतील.
विद्यार्थ्यांच्या गटास कारागृहात प्रवेश
अनेकांना कारागृह पाहण्याची इच्छा असते. महाविद्यालयातील जास्तीत जास्त ३५ विद्यार्थ्यांच्या गटाला शैक्षणिक कारणास्तव कारागृहात भेट देण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करुन गटाने कारागृहाला भेट देता येणार आहे.