लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहराचे सांस्कृतिक धोरण वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने तो प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असताना आता मुंढवा येथे टाउन प्लॅनिंग (टीपी) योजना करण्याचा प्रस्तावदेखील दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. शहर सुधारणा समितीच्या बैठकीत हा विषय दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला.
मुंढवा भागात महापालिकेच्या वतीने नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. गुरुवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा विषय मान्य केल्यास महापालिकेत प्रशासकराज असतानाही इतका महत्त्वाचा निर्णय कसा घेतला, यावर चर्चा होऊन त्याचे पुढील काळात जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता होती. त्यामुळे एक पाऊल मागे घेऊन प्रशासक डॉ. भोसले यांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा महापालिकेत सुरू होती.
मुंढवा भागासाठी २०१७ मध्ये विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या क्षेत्रातील सर्व्हे नंबर ४५ ते ४८, तसेच सर्वे नंबर ६४ ते ७० आणि परिसराचा विकास योग्य पद्धतीने झालेला नाही. त्यामुळे या भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी येथे टाउन प्लॅनिंग (टीपी) स्कीम राबविण्यात यावी, असे पत्र भाजपचे माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांनी महापालिकेला दिले होते.
यानंतर महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव सादर केला होता. या भागातील विकास करण्यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, शहर सुधारणा समितीच्या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा प्रस्ताव रद्द करून दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेतला.
टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय हा धोरणात्मक आहे. त्याबाबतचा प्रस्ताव व निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करून घेणे आवश्यक आहे. सध्या महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपली असून तीन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकराज आहे. प्रशासक काळात अत्यावश्यक बाबी वगळता धोरणात्मक निर्णय घेण्याचे टाळले जाते. त्यानुसार हा प्रस्ताव रद्द केल्याची चर्चा आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.