राज्यभरात मागील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, शेकडो हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. याचबरोबर, पुणे जिल्ह्यासाठी लवकरात लवकर पालकमंत्री द्यावा. अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज(मंगळवार) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘ईडी’ सरकार येऊन काहीच दिवस झाले असताना, या दरम्यान तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे ‘ईडी’ सरकारने शेतकऱ्यांचा विचार करिता लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा.”

तसेच, “याचबरोबर पुण्याच्या विकास कामांना खीळ बसली आहे. त्यामुळे लवकरात जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमला जावा, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल.” असा इशारा देखील यावेळी जगताप यांनी दिला.