आधारभूत किंमत कमी झाल्याने लागवडीचे प्रमाण कमी

पुणे : केंद्र सरकारने बासमती तांदळाची न्यूनतम आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल १८८८ रुपये अशी निश्चित केली आहे. गेल्या वर्षी बासमतीची आधारभूत किंमत २००० ते २४०० रुपये ठरविण्यात आली होती. यंदा आधारभूत किमतीत शंभर ते पाचशे रुपये एवढी घट झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम उत्तरेकडील राज्यात होणाऱ्या बासमती लागवडीवर झाला आहे. बासमतीच्या बियाणांना असलेल्या मागणीत घट झाल्यामुळे पुढील वर्षी बासमतीच्या उत्पादनातही घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतातून दरवर्षी २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ जगभरात निर्यात केला जातो. बासमती तांदळाला ‘किंग ऑफ राईस’ असे म्हटले जाते. भारतीय बासमतीचा विशेष प्रकारचा सुगंध आणि स्वादामुळे जगभरातून त्याला मागणी वाढत आहे. मात्र, आधारभूत किंमत घटल्याने बासमतीची लागवड यंदा कमी झाल्याने उत्पादनही कमी होणार आहे.

पंजाब, हरियाणा, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली तसेच उत्तरप्रदेशाच्या पश्चिम भागात बासमती तांदळाची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली जाते.  बासमतीच्या उत्पादनासाठी पाणी, हवामान, माती, धान (बीज) महत्त्वाचे ठरते. गंगा नदीचे किनारे आणि पाण्यामुळे बासमतीचे उत्पादन उत्तरेकडे चांगले होते.  साधारण तांदळाच्या बियाणांपेक्षा बासमतीचे बीज महाग असते, असे मार्केटयार्डातील तांदूळ व्यापारी जयराज अँड कंपनीचे संचालक राजेश  शहा यांनी सांगितले.

बासमती तांदळाच्या लागवडीस चार महिने लागतात. लागवड क रताना शेतक ऱ्यांना काळजी घ्यावी लागते. बासमतीस साधारण तांदळापेक्षा दीडपट किंवा दुप्पट भाव मिळाले नाहीत तर, शेतकरी बासमतीची लागवड कमी करतील. या सर्व बाबींचा विचार करता यंदा उत्तरेकडील राज्यातील शेतक ऱ्यांनी बासमतीची लागवड कमी केली आहे. बासमतीच्या बियाणांची विक्रीही गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्य़ांनी कमी झाली आहे. त्यामुळे बासमतीचे उत्पादनही यंदाच्या हंगामात कमी होणार आहे.

उत्तरेकडील सात राज्यांतील ९५ जिल्ह्य़ात  बासमतीची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. बासमती तांदळाचे उत्पादनक्षेत्र १९ ते २० लाख हेक्टर आहे. यंदाच्या वर्षी उत्तरेकडील राज्यात बासमती पेरणीचे प्रमाण पाच ते आठ टक्क्य़ांनी कमी होण्याची शक्यता आहे. यात १५०९ जातीच्या बासमतीची पेरणी कमी होण्याची शक्यता आहे. बासमतीचे प्रतिहेक्टर उत्पादन ५० ते ६० क्विंटल एवढे होते. एका हेक्टरमध्ये जास्तीत जास्त उत्पादन ६५ क्विंटल एवढे येऊ शकते. अपेक्षेएवढा भाव न मिळाल्याने बासमती उत्पादक शेतक ऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागेल. या सर्व बाबींचा विचार करता तांदळाचा राजा अशी ओळख असलेल्या बासमतीचे उत्पादन यंदा पाच ते आठ टक्क्य़ांनी कमी होण्याची शक्यता आहे.

– राजेश शहा, तांदूळ व्यापारी, वरिष्ठ उपाध्यक्ष,  फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)