मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने टोमॅटो, घेवडा, कोबी, ढोबळी मिरची, शेवग्याच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (३ जुलै ) राज्य तसेच परराज्यातून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा, इंदूरहून ७ टेम्पो गाजर,हिमाचल प्रदेशातून ३० गोणी मटार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ ते १० ट्रक लसूण, कर्नाटकातून २ टेम्पो तोतापुरी कैरी, आग्रा, इंदूरमधून मिळून ३० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, कोबी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गवार ५ ते ७ टेम्पो, ढोबळी मिरची १४ ते १५ टेम्पो, टोमॅटो बारा ते तेरा हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, भुईमुग शेंग ७० ते ८० गोणी, कांदा ८० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

कोथिंबिरीची आवक कमी

गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक कमी झाली आहे. चुका, शेपू, करडई, चवळई, पालकाचे दर स्थिर असून अन्य पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात दीड लाख कोथिंबीर जुडी, मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या जुडीमागे ४ ते ५ रुपये, कांदापातीच्या जुडीमागे ३ रुपये, पुदिन्याच्या जुडीमागे १ रुपये तसेच मुळा, मेथी, अंबाडी, राजगिरा,चाकवत या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

डाळिंब, सीताफळ, पपईच्या दरात वाढ

घाऊक फळबाजारात डाळिंब, सीताफळ, पपईच्या दरात वाढ झाली. लिंबू, कलिंगडाच्या दरात घट झाली आहे. अननस, पेरू, संत्री, मोसंबी, खरबुजाचे दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळहून ४ ट्रक अननस, डाळिंब ४० ते ५० टन, मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १ ते दीड टन, कलिंगड २ ते ३ ट्रक, खरबूज २ ते ३ टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, पपई ७ ते ८ टेम्पो, पेरू ३०० ते ३५० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decrease in prices of tomato cabbage chili pune print news amy
First published on: 03-07-2022 at 16:07 IST