युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य पुण्यातील ‘दीपस्तंभ फाउंडेशन’ करत आहे. त्यांनी दिव्यांग, अनाथ, तृतीयपंथी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांसाठी निवासी उच्च शिक्षण, प्रशिक्षणाची विनामूल्य व्यवस्था केलेली आहे. फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांच्याशी १५ जुलैच्या ‘जागतिक युवा कौशल्य दिना’च्या निमित्ताने श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

‘दीपस्तंभ’चे ध्येय काय आहे?

फाउंडेशनचे कार्य सुरू झाल्यापासून म्हणजेच २००९ पासून फाउंडेशनने एकमेव ध्येय ठेवले आहे, ते म्हणजे शारीरिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित युवकांच्या विकासासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे. त्याबरोबरच सर्वांना समान संधी मिळेल, असा सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. फाउंडेशनचा ‘मनोबल’ हा उपक्रम असून, या उपक्रमामध्ये दहावी, बारावीनंतरच्या शिक्षणाच्या सुविधा, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक प्रशिक्षण फाउंडेशतर्फे दिले जाते.

यात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला जातो. आई-वडील नसणाऱ्या अनाथ मुलांसाठी वयाच्या १८ व्या वर्षांनंतर निवासी उच्च शिक्षणाची व प्रशिक्षणाची सुविधा नव्हती. २०१६ पासून संस्थेने अशा अनाथ विद्यार्थ्यांनाही सामावून घेतले आणि प्रशिक्षणाबरोबर त्यांना हक्काचे घरसुद्धा उपलब्ध करून दिले. प्रशिक्षण कार्यक्रमात करिअर मार्गदर्शनापासून उद्योजकता विकासापर्यंत मार्गदर्शन केले जाते. देशातील १४ राज्यांतील विद्यार्थी फाउंडेशनच्या कामाचा लाभ घेत आहेत.

फाउंडेशन सुरू करण्याचा विचार कसा केला?

सबळ व्यक्तींबरोबरच दुर्बल व्यक्तींनाही चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार आणि संधी मिळाली पाहिजे. उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी उत्तम शिक्षण आणि सकारात्मक वातावरणाची गरज असते. ज्यांना शिक्षण मिळत नाही, अशा वंचित घटकांना गुणवत्तापूर्वक उच्च शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर काम करण्याचा संकल्प मी सोडला आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी या फाउंडेशनची स्थापना केली. महाराष्ट्रभर व्याख्याने देत असताना अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रशिक्षणाबरोबरच त्यांच्या निवारा आणि भूक या गरजांचे काय, या प्रश्नावर विचार केला. काही दिव्यांग विद्यार्थ्यांनादेखील प्रशिक्षणाची गरज असल्याचे लक्षात आले आणि त्यातूनच ‘मनोबल’ हा कौशल्य प्रशिक्षण देणारा पहिला प्रकल्प उभा राहिला.

बौद्धिक क्षमता असूनही केवळ तृतीयपंथी आहेत म्हणून पुढे शिकण्याची, काम करण्याची संधी मिळत नसल्याचे लक्षात आले आणि आम्ही त्यांनाही या उपक्रमात सामावून घेतले. त्यामुळे दिव्यांग, प्रज्ञाचक्षू, अनाथ, तृतीयपंथी, आदिवासी, वंचित घटकांसाठी हा देशातील सर्वसमावेशक निवासी प्रकल्प असल्याचे आम्ही अभिमानाने सांगतो. सुरुवातीला दुष्काळग्रस्त भागातील, आत्महत्याग्रस्त शेतकरी, देवदासी भगिनींची मुले, व्यसनग्रस्त घरातील दहा विद्यार्थ्यांची निवड केली गेली. त्यांच्यासाठी निवास, भोजन, प्रशिक्षण, ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सुरू केले. त्यातून घडलेले अनेक विद्यार्थी आज देशभर वेगवेगळ्या पदांवर, तसेच प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

इतर उपक्रम कोणते?

देशभरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यामध्ये दिव्यांग, अनाथ तसेच इतरही विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी व्याख्याने, कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते. युवकांसाठी करिअर, व्यक्तिमत्त्व विकास व चांगला माणूस घडण्यासाठी निवासी शिबिरे आयोजिली जातात. प्रेरणादायी व मार्गदर्शक पुस्तकांचे प्रकाशन करून आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियानासारखे उपक्रम राबविले जातात.

या सामाजिक कार्याची प्रेरणा काय होती?

जळगाव व पुण्यात शिकत असताना विविध सामाजिक कामांमध्ये मला सक्रिय सहभागी होता आले. ज्ञानप्रबोधिनीसारख्या संस्थेत काम करण्याचा अनुभव मिळाला. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्तींच्या विचाराने कार्यातून प्रेरित झालो. समाजातील सर्वांत गरजू घटकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी पूर्ण आयुष्य काम करण्याचा संकल्प केला.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि शिक्षकांना प्रशिक्षण देत मी ठिकठिकाणी व्याख्याने देऊ लागलो. फाउंडेशनच्या कार्यासाठी सुरुवातीचे आर्थिक बळ, व्याख्यानांचे मानधन आणि शेतीवाडी, घर विकून आलेल्या पैशातून मिळवले. हे कार्य पुढे नेण्यासाठी अनेकांचे पाठबळ मिळाले. आता अनेकानेक युवक स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत, याचा सार्थ अभिमान आहे.
shriram.oak@expressindia.com