पुणे : शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्याने शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्या विषयी समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत शहर अभियंता प्रशांत वाघमारे (वय ५४) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी लिगल राईट ऑबर्झव्हेटरी एलआरओ या समाजमाध्यमातील खातेधारक तसेच वापरकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेकडून शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. महापालिकेत बेकायदा कृत्य करणारी टोळी आहे. या टोळीचे नेतृत्त्व प्रशांत वाघमारे, माधव जगताप करतात.
हेही वाचा >>> पुण्यात एक लाख विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नोंदवला विक्रम
रोहिंगे फेरीवाल्यांकडून पैसे घेऊन ते कारवाई करतात. त्यांची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी), प्राप्तीकर विभागाकडे करणार आहे, असा मजकूर समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आला. याबाबतची माहिती वाघमारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.