देशाच्या संरक्षण संशोधन क्षेत्राचा विचार करता आवर्जून दोन नावांचा उल्लेख करावा लागतो, तो म्हणजे विख्यात भौतिकशास्त्रज्ञ, सुरक्षातज्ज्ञ, नोबेलविजेते पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट अर्थात पीएमएस ब्लॅकेट आणि भौतिकशास्त्रज्ञ आणि भारतामध्ये संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे पद्मविभूषण सन्मानप्राप्त डॉ. दौलतसिंह कोठारी अर्थात डॉ. डी. एस. कोठारी. हे दोघेही विख्यात शास्त्रज्ञ लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात होते. विख्यात शास्त्रज्ञ रुदरफोर्ड यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
ब्लॅकेट यांचे भौतिकशास्त्रासह संरक्षण आणि लष्करी क्षेत्रातही योगदान आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लष्करी अधिकारी आणि वैज्ञानिक सामरिक तज्ज्ञ म्हणून त्यांनी भूमिका बजावल्या. भौतिकशास्त्रज्ञाबरोबरच सामरिक दृष्टिकोनातून विचार करणाऱ्यांपैकी ब्लॅकेट एक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील संरक्षणाच्या बाबतीत ब्लॅकेट यांचा सल्ला घेतला. भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत १९४८ मध्ये त्यांनी एक अहवाल सादर केला. संरक्षण संशोधनाच्या बाबतीतील सुरुवातीच्या या घडामोडीनंतर ‘डिफेन्स सायन्स ऑर्गनायझेशन’ पुढे अस्तित्वात आली. नंतर ती भारतातील विख्यात संरक्षण, संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) म्हणून ओळखली जाते. पुण्यातील तत्कालीन ‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट स्टडीज’च्या (आताची डीआयएटी) स्थापनेमध्येही ब्लॅकेट यांचे योगदान होते.
डॉ. डी. एस. कोठारी यांचे संरक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोठे काम आहे. दिल्ली विद्यापीठामध्ये त्यांनी काम केले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे ते अध्यक्ष होते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुधारणा घडविण्यासाठी स्थापण्यात आलेल्या आयोगाचे ते अध्यक्ष होते. ते भारताचे संरक्षण मंत्रालयाचे पहिले वैज्ञानिक सल्लागार होते. या पदावर १९४८ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. संरक्षण क्षेत्रामधील विज्ञानाचे महत्त्व ओळखून या क्षेत्रातील संशोधनाची जबाबदारी डॉ. कोठारी यांना देण्यात आली. ब्लॅकेट यांनीही त्यांना या संदर्भातील सल्ले दिले. पहिल्या टप्प्यात ऑपरेशनल रीसर्च, बॅलिस्टिक्स, स्फोटके, शस्त्रास्त्रे, रॉकेट आणि क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, नौदलाचे तंत्रज्ञान, इंजिनीअरिंग क्षेत्रे संशोधनासाठी निवडली. यातीलच एक भाग म्हणून पुण्यामध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट स्टडीज’ची (आताची डीआयएटी) स्थापना झाली. याखेरीज ‘डीआरडीओ’च्या अनेक प्रयोगशाळा उभारण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. संरक्षण क्षेत्रामधील संशोधनाचा पाया त्यांनी रचला.
‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’ या संस्थेची स्थापना पॅट्रिक ब्लॅकेट आणि डॉ. डी. एस. कोठारी यांनी १९५२ मध्ये केली. त्या वेळी या संस्थेचे नाव ‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट स्टडीज’ असे होते. ही संस्था दापोडी येथील ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग’च्या (सीएमई) परिसरात सुरू झाली. १९६७ मध्ये संस्थेचे नाव ‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी’ असे ठेवण्यात आले आणि ही संस्था सध्या असलेल्या गिरिनगर येथे हलविण्यात आली. १९६४ आणि १९८१ मध्ये संस्थेमधील प्रशिक्षणाची व्याप्ती वाढविण्यात आली. केवळ शस्त्रांशी संबंधित नव्हे, तर तंत्रज्ञानाशी निगडित इतर अनेक विषयांचा समावेश करण्यात आला. १९८० मध्ये पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर अभियांत्रिकीसाठी आठ अभ्यासक्रमांना मान्यता दिली. सन २००० मध्ये या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. १ एप्रिल २००६ पासून या संस्थेला सध्या असलेले नाव मिळाले. ‘शास्त्रेण शस्त्रम प्रकरोति रक्षाम’ हे या संस्थेचे बोधवाक्य आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण, संशोधन व विकास विभागाच्या अखत्यारित ही संस्था येते. संरक्षण तंत्रज्ञानाशी निगडित अनेक पदव्युत्तर आणि त्यापुढील अभ्यासक्रम येथे चालविले जातात. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना किंवा संरक्षण दलांतील निवडक अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते. पुण्यातील गिरिनगर भागात ४९६ एकर परिसरात विविध सोयी-सुविधांनी सज्ज अशी ही संस्था आहे. ‘अ’ दर्जाचे हे अभिमत विद्यापीठ असून, राष्ट्रीय क्रमवारीत ते ५७ वे सर्वोत्कृष्ट विद्यापीठ आहे. संरक्षण, संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओ) देशभरातील प्रयोगशाळांचे सहाय्य ‘डीआयएटी’ला आहे. विद्यापीठाने २०१३ पासून ५० पेटंटसाठी अर्ज केले आहेत. विद्यापीठात ‘एमटेक’, ‘एमएससी’, ‘एमएससी टेक’, ‘पीएचडी’ आणि इतर अल्प कालावधीचे अभ्यासक्रम चालविले जातात.
संरक्षण क्षेत्राला उपयुक्त ठरतील, अशा तंत्रज्ञानाचा आणि अभ्यासक्रमांचा विचार येथे केला जातो. यामध्ये प्रामुख्याने यूएव्ही, गाइडेड क्षेपणास्त्रे, लेझर तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे आणि लढाऊ वाहने, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, फोटॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, डेटा सायन्स, अॅप्लाइड फिजिक्स, केमिस्ट्री अशा विषयांचा समावेश आहे.
कोरोनाच्या काळात ‘अतुल्य’ हे इच्छित स्थळी नेता येणारे स्टरलायझर, ‘अनन्या’ हे पाण्यावर आधारित ‘नॅनो डिसइन्फेक्टंट स्प्रे’, ‘पवित्रपती’ हा फेस मास्क, ‘आश्रय’ हे संसर्ग रोखण्यासाठीचे साहित्य अशी काही उत्पादने तयार केली होती. याखेरीज, विविध प्रकल्पांवर तेथे काम चालते.
देशात संरक्षण तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. अशा वेळी पुण्यातील ही संस्था संरक्षण दलांसाठी महत्त्वाची राहणार आहे.
prasad.kulkarni@expressindia.com
