पिंपरी : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारपासून (७ जुलै) सुरू होत आहे. मंगळवारी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बुधवारी आळंदीतून आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह देहू-आळंदी मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल ४ ते ८ जुलैपर्यंत असणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी देहू, आळंदी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

तुकोबारायांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहूतील इनामदार वाडा येथे असून, बुधवारी ( ८ जुलै ) हा सोहळा आकुर्डीतील विठ्ठल मंदिर येथे मुक्कामासाठी येणार आहे. तसेच माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीतीलच गांधी वाडा येथे असेल. त्यानंतर या दोन्ही पालख्या गुरुवारी (९ जुलै) पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.

आळंदीतील वाहतूक बदल

चिंबळी ते आळंदी रस्ता जड अवजड वाहनांसाठी बंद राहणार असून, चाकण ते आळंदी आणि चिंबळी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणारी वाहने भारतमाता, पांजरपोळ, अलंकापुरम चौक मार्गे जातील. शेलपिंपळगाव, वडगाव घेणंद ते आळंदी या मार्गावरील वाहने चाकण-वडगांव घेणंद शेलपिंपळगाव मार्गे कोयाळी कमान, कोयाळी-मरकळगाव मार्गे जातील. मरकळ ते आळंदी या मार्गावरील वाहने मरकळकडून धानोरे फाटा मार्गे चऱ्होली फाटा – मॅगझीन चौक, अलंकापुरम चौक मार्गे जातील. भारतमाता चौक ते आळंदी या मार्गावरील वाहने मोशी चौक, पाजंरपोळ, अलंकापुरम चौक मार्गे, मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे जातील. विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गावरील वाहने बोपखेल फाटा, दिघी मॅगझीन चौकाकडून अलंकापुरम चौक, चऱ्होली फाटा, मरकळमार्गे जातील.

आळंदी शहरात येण्यास सर्व वाहनांना मनाई

चऱ्होली फाटा चौक, डुडुळगाव जकात नाका, केळगाव, बोपदेव चौक, विश्रांतवाडी, धानोरी, देहूफाटा आणि हवालदार वस्ती ते तळेकर पाटील चौकातून आळंदीकडे जाण्यास सर्व प्रकारांच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. तळेकर पाटील चौकातून उजवीकडे वळून डुडुळगाव असा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. डुडुळगाव चौकातून इंद्रायणी नदीपुलावरुन चाकणमार्गे जाता येणार आहे. भारतमाता चौक ते वाय जंक्शन हा मार्ग एकेरी करण्यात आला आहे. हा बदल ४ ते ८ जुलै दरम्यान राहणार आहे. विश्रांतवाडी, पुणे, बोपखेल ते आळंदी, मरकळ, चऱ्होली ते आळंदी, मोशी चौक तसेच भारतमाता चौक, हवालदार वस्ती मार्गे देहूफाटा, आळंदी फाटा, चाकण ते चिंबळी फाटा, आळंदी, वडगाव घेणंद ते विश्रांतवाडी मार्गे आळंदी, पांजरपोळ चौक ते अलंकापुरम मार्गे आळंदी, भोसरीतून मॅगझिन चौक, दिघी, बोपखेल या पालखी मार्गाला मिळणाऱ्या सर्व रस्त्यांवरुन येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. देहूफाटा आळंदी ते बोपखेल फाटा दरम्यान पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूस नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. हा बदल ९ ते २१ जुलै दरम्यान असणार आहे.

देहूतील वाहतुकीत बदल

मुंबई-पुणे महामार्गावरील देहू कमान ते देहूगाव या मार्गावरील वाहतूक जड, अवजड वाहनांसाठी बंद राहणार असून, या मार्गावरील वाहने भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅनबे चौक ते खंडेलवाल चौक देहूगाव या मार्गे जातील. तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा ते देहूगाव हा मार्ग बंद राहणार असून, या मार्गावरील वाहने एचपी चौकमार्गे जातील. आयटी पार्क, कॅनबे चौक ते काळोखे पाटील चौक हा मार्ग बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल, एचपी चौक, तळवडे गावठाण, त्रिवेणीनगर चौक मार्गे जातील. काळोखे, खंडेलवाल चौक, तुकाराम वजन काटा, कंद पाटील, परंडवाल, हॉटेल कॉर्नर, साईराज, भैरवनाथ चौक, मुख्य कमानीकडून देहूगावकडे जाणाऱ्या आणि देहू कमान ते चौदा टाळकरी कमान, इनामदार वाडा या मार्गावर जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. मुंबई-पुणे महामार्गावरील सेंट्रल चौक देहूरोड ते भक्ती शक्ती मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून, या मार्गावरील सर्व प्रकारची वाहने सेंट्रल चौक-मामुर्डी- किवळे-भूमकर चौक – डांगे चौक मार्गे जातील.

आळंदीत वाहनतळांची व्यवस्था

आळंदी- देहू रस्त्यावरील तळेकर पाटील चौक (दक्षिणेस), वहिले पार्किंग, आदित्य शाळा, ज्ञानविलास महाविद्यालय डुडुळगाव जकात नाक्याजवळ, बोपदेव चौक, इंद्रायणी रुग्णालयासमोर (चाकण रोड), विश्रांतवाडी वडगाव रस्ता, आळंदी नगरपरिषद, पॉलिबॉण्ड कंपनीसमोर, प्लुमेरिया मंगल कार्यालय, बैलगाडा घाट चऱ्होली, मुक्ताई मंगल कार्यालयासमोर वाहतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

देहूगावातील वाहनतळ

देहूगाव येथील गायरान मैदान, सीओडी मैदान (राधा कृष्ण मंगल कार्यालयाजवळ), खंडेलवाल चौक येथील माऊली वजनकाटा शेजारील मैदान, सप्तपदी मंगल कार्यालय, भगीरथी लॉन्स येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.