पुणे : रयतेचे स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची थोरवी सांगणारे आधुनिक संग्रहालय (छत्रपती शिवाजी महाराज एक्स्पिरेन्शिअल म्युझियम) देशाची राजधानी दिल्लीमध्ये साकारण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नऱ्हे आंबेगाव येथे राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानाच्या वतीने उभारण्यात येत असलेली ‘शिवसृष्टी’ आकाराला आणणाऱ्या पुण्यातील गार्डियन मीडिया अँड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने दिल्लीमध्ये ‘कुतुब मिनार’जवळ असलेल्या ‘कुतुब इन्स्टिट्यूशनल एरिया’मध्ये हे संग्रहालय साकारण्याचे शिवधनुष्य पेलले आहे.
दिल्ली येथे कार्यरत श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीने हे संग्रहालय साकारण्याचे स्वप्न सत्यामध्ये आणले आहे. संस्थेचे सरचिटणीस कर्नल मोहन काकतीकर आणि मिलिंद पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ‘अवघ्या १८ महिन्यांमध्ये हे संग्रहालय साकारण्याची जबाबदारी पूर्णत्वास नेता आली, हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे,’ अशी माहिती ‘गार्डियन मीडिया अँड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक संजय दाबके यांनी दिली.
संस्थेच्या ३० हजार चौरस फूट जागेवर हे संग्रहालय साकारण्यात आले असून, त्यासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ‘गार्डियन’चे शंभर तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या चमूने दीड वर्षाच्या प्रयत्नांतून हे संग्रहालय साकारले असल्याचे दाबके यांनी सांगितले.
‘रायगडावर १९७६ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशेव्या राज्याभिषेक साेहळ्यास तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा देशभर पोहोचवण्याच्या उद्देशातून इंदिरा गांधी यांच्या प्रेरणेतून दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीची स्थापना करण्यात आली. या संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संग्रहालय साकारण्याची संधी दिली, याचा आनंद आहे. गणेश ढालपे, कौस्तुभ कस्तुरे आणि सौरभ वैशंपायन यांनी हे संग्रहालय साकारण्यामध्ये योगदान दिले आहे,’ असे दाबके यांनी नमूद केले.
असे आहे संग्रहालय
- छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्रदालन
- १३-डी राइडमधून उलगडणार शिवपूर्व काळ
- रायगडाची प्रतिकृती
- सुरतेची लूट का केली, याचे विस्तृत विवेचन
- खांदेरी-उंदेरी या इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या समुद्री लढाईत मिळालेला विजय (१५ मिनिटांची मल्टिमीडिया चित्रफीत)
- शाहिस्तेखानावरचा हल्ला
- ‘पॅनोरमा’वर (मोठा पडदा) ‘आग्ऱ्याहून सुटका’ ही ३० मिनिटांची चित्रफीत
- ‘डार्क राइड’ वाहनात बसून २३ मिनिटांमध्ये शिवचरित्रातील प्रसंगांचे घडणारे दर्शन
- कवी भूषण, शिवरायांचे गुप्तहेर खाते, दक्षिण दिग्विजयासह पाच मिनिटांचे पाच लघुपट पाहण्याची संधी.
