पुणे : दिल्ली ते पुणे विमान प्रवासादरम्यान विमानातून आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आणल्या प्रकरणी विमान प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खासगी विमान कंपनीतील कर्मचारी ओंकार विनोद कुलकर्णी (वय २८) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका प्रवाशाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता १२५, तसेच विमान अधिनियम २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३३ वर्षीय प्रवासी तरुणाला नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी तरुण पुणे जिल्ह्यातील सासवड परिसरात राहायला आहे. तो सोमवारी (२ नाेव्हेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दिल्ली-पुणे ते या मार्गावरील विमानाने प्रवास करत होता. आपत्कालीन परिस्थितीत विमानातून बाहेर पडण्यासाठी दरवाजा असतो. प्रवाशाने विमानातील कर्मचाऱ्यांची परवानगी न घेता आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आपत्कालीन परिस्थिती बाहेर पडण्याचा दरवाजा उघडण्याचे अधिकार विमानातील कर्मचाऱ्यांना असताना गुन्हा दाखल केलेल्या प्रवाशाने विमानातील अन्य प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.