scorecardresearch

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आनंदात सुकलेल्या जखमांची खपली का काढावी?

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा करण्यात येत असताना १४ ऑगस्ट २०२२ हा दिवस ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ (फाळणी शोकांतिका स्मृती दिवस) म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक नाशिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आनंदात सुकलेल्या जखमांची खपली का काढावी?
प्रतिनिधीक छायाचित्र

विभाजन विभिषिका स्मृती दिवस साजरा करण्याचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा करण्यात येत असताना १४ ऑगस्ट २०२२ हा दिवस ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ (फाळणी शोकांतिका स्मृती दिवस) म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक नाशिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे. मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आनंदात सुकलेल्या जखमांची खपली का काढावी, असा प्रश्न मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षणहक्क सभा या संघटनांनी उपस्थित करत संबंधित परिपत्रक रद्द करण्याची मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

गेल्या काही वर्षांत देशात मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण केले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यात सीएए, एनआरसीची एक पार्श्वभूमी आहे. नुपूर शर्माचे ताजे उदाहरण समोर आहे, हिजाब, हलाल, अजानसारख्या इतरही विषयातून सामाजिक-धार्मिक वातावरण कलुषित झाले आहे. अशा वातावरणात विभाजन विभिषिका स्मृती दिवस साजरा करण्याच्या निर्देशाचा काय गर्भितार्थ समजायचा, असा प्रश्न मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी, अखिल भारतीय समाजवादी शिक्षणहक्क सभेचे राष्ट्रीय संघटक प्रा. शरद जावडेकर यांनी उपस्थित केला.

सर्व समाज घटकांच्या सहभागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा अधिक संयुक्तिक आणि आनंददायी आहे. विभाजन विभिषिका स्मृती दिवसाचे आयोजन नकळतपणे नकारात्मक वातावरणास वाव देणारा ठरू शकतो. भारतीय स्वातंत्र्याचा तसेच फाळणीचा निरपेक्ष इतिहास शालेय अभ्यासक्रमात जरुर असावा. मात्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना असे प्रयोग उचित नसल्याने संबंधित परिपत्रक रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या