पुणे : ‘महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा,’ असे पत्र शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून गुरुवारी पुणे महापालिका आयुक्तांना देण्यात आले. ‘या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.

केबिनमध्ये येऊन मानसिक त्रास देतो, अशी तक्रार चार ते पाच महिन्यांपूर्वी एका महिला अधिकाऱ्याने अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडे आणि महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र, त्याची दखल महापालिका प्रशासनाने न घेतल्याने महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली. ‘भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांकडेही तक्रार केली होती. मात्र त्यांनी दखल घेतली नाही,’ असा दावाही या महिला अधिकाऱ्याने गुरुवारी केला.

या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे) पक्षाने आयुक्तांना पत्र दिले. तसेच, महापालिकेने या पदाधिकाऱ्यावर दबावामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, ‘महिला अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाच्या अंतर्गत महिला तक्रार समितीने याची चौकशी करून अहवाल महापालिका आयुक्तांकडे दिला. यामध्ये महिला अधिकाऱ्याच्या कक्षाच्या बाहेर सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक नेमावेत, नागरिकांनी दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांशी वाद न घालता संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांशी बोलावे, तसेच अशा दंडेलशाही वृत्तीला आळा घालण्यासाठी पावले उचलावीत, अशी शिफारस करण्यात आली होती,’ अशी माहिती अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली. मात्र, याबाबत आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांना विचारले असता, आपल्याकडे असा अहवाल आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला, तरी कोणालाही महापालिकेत असे वर्तन करता येणार नाही. याची संपूर्ण माहिती घेतली जाईल. अधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या व्यक्तींचा महापालिकेत प्रवेश बंद केला जाईल.- नवल किशोर राम, महापालिका आयुक्त