पुणे : पावसाळ्यात गरमागरम कणसांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच. पावसाळ्यात कणसांच्या मागणीत वाढ झाली असून, मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणावर कणसांची आवक होत आहे. पर्यटनस्थळांवरून कणसांना मागणी वाढली आहे.

यंदा मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर कणसांची तुरळक आवक बाजारात झाली. जून महिन्यात बाजारात सुमारे ७०० ते ८०० पोती कणसांची आवक झाली. गेल्या आठवड्यापासून कणसांची आवक वाढली असून, बाजारात दररोज दीड हजार पोतींची आवक होत आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माउली आंबेकर यांनी सांगितले.

वर्षा विहारासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी होत आहे. लोणावळा, खंडाळा, खडकवासला, सिंहगड, लोहगड, महाबळेश्वर तसेच कोकणातील विक्रेत्यांकडून कणसांना मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारातून हैद्राबाद, गुजरात, गोवा येथे कणीस विक्रीस पाठविली जात आहेत. एका पोत्यात सुमारे ३८ ते ४० किलो कणीस असतात. घाऊक बाजारात एक किलो कणसांना १२ ते २० रुपये असे दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो कणसांना प्रतवारीनुसार २० ते ३० रुपये दर मिळाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

चांगले दर मिळाल्याने शेतकरी समाधानी

पुणे जिल्ह्यातील मंचर, चाकण, खेड, नारायणगाव, तसेच अहिल्यानगर, नाशिक भागात कणसांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पावसाळा आणि थंडीत कणसांना मागणी वाढते. त्यामुळे शेतकरी दोन टप्यात कणसांची लागवड करतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कणसांना चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रक्रिया उद्योगांकडून मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिवळे धमक कणीस ‘अमेरिकन स्वीटकाॅर्न’ म्हणून ओळखले जाते. प्रक्रिया उद्योग, तसेच उपाहारगृहचालकांकडून कणसांना वर्षभर मागणी असते. कणीस बारामाही उपलब्ध असते. शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्याने पुणे, अहिल्यानगर, नाशिक भागातील शेतकरी पावसाळ्यापूर्वी दोन ते अडीच महिने कणसांची लागवड करतात, असे मार्केट यार्डातील व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माउली आंबेकर यांनी सांगितले.