पुणे : मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी ससून रुग्णालयासमोरील जागा मिळावी, या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतरही हा प्रश्न न सुटल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जवाब दो’ आंदोलन करण्याचा इशारा सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने माजी आमदार जयदेव गायकवाड, अविनाश साळवे, रोहिदास गायकवाड, वसंत साळवे, अरविंद तायडे आणि परशुराम वाडेकर यांनी या आंदोलनाची माहिती दिली.
गायकवाड म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगतची जागा विस्तारीकरणासाठी देण्याचा ठराव २० जुलै २००० रोजी पुणे महापालिकेची स्थायी समिती व मुख्य सभेने बहुमताने मंजूर केला होता. मात्र, ४ सप्टेंबर २०२४ पासून खासगी व्यावसायिकाला ६० वर्षांच्या भाडेकरारावर ही जागा देण्याचा बेकायदा करार केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एखादा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यास त्याची तत्काळ अंमलबजावणी होण्याऐवजी नियम धाब्यावर बसवून कायद्याची पायमल्ली करत घाईगडबडीने हा भूखंड खासगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. पक्ष व राजकारण बाजूला ठेवून आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा विषय असलेली ही जागा खासगी कंपनीला देऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.’