पुणे : गणेशोत्सवातील ढोल-ताशा पथकांची संख्या कमी करण्यासाठी नियमावली करावी, डिजे आणि लेझरचा वापरास मनाई करण्यात यावी, शांतता क्षेत्रात मंडळांना परवानग्या देण्यात येऊ नये, ढोल-ताशा पथकांच्या सरावामुळे त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे, अशा गणेशोस्तावातील उच्छादाच्या तक्रारी वजा सूचना सजग नागरिकांनी बुधवारी केल्या.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेमध्ये पार पाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठक बुधवारी महापालिकेत झाली. त्यावेळी सजग नागरिकांनी उत्सव काळातील उच्छादाबाबतच्या तक्रारी केल्या.दरम्यान, गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त, प्रशासक डाॅ. राजेंद्र भोसले यांनी काही सूचना केल्या.

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदींनी जाहीर करुनही क्षयमुक्त भारताचे लक्ष्य अजून दूरच

आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, उप आयुक्त महेश पाटील, माधव जगताप, सोमनाथ बनकर, आशा राऊत, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरूद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, आरोग्य अधिकारी डाॅ. नीना बोराडे, पोलीस उपायुक्त संदीप गिल यांच्यासह सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी, अध्यक्ष आणि कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते.

महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन सर्वच गणेश मंडळांनी करणे आवश्यक आहे. मंडळांनाही ध्वनी प्रदूषण नको आहे. मात्र पोलीस आणि महापालिकेने सर्वांना एक समान न्याय द्यावा, अशी भूमिका सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मांडली.

हेही वाचा >>>Zika virus : पुरानंतर पुण्यात आता झिकाचा धोका! एकाच दिवशी सात रुग्ण आढळले; सहा गर्भवतींचा समावेश

या बैठकीत पर्यावरणप्रेमी, सजग नागरिक, सामाजिक संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी उत्सवातील ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी, लांबलेल्या मिरवणुकांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. ढोल-ताशा पथकांच्या सरावामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत आहे. त्यामुळे नियमावली करावी, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली.

दरम्यान, मंडळे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. गरजूंना मदत करतात. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कार्यकर्ते पुढाकार घेतात. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्यात येऊ नये, अशी अपेक्षा मंडळांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आली. महापालिकेने मंडळांना अनुदान द्यावे, पार्किंगची व्यवस्था करावी, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवावी, निवासी दराने वीज देयकाची आकारणी करावी, ढोल-ताशा पथक आणि ध्वनीक्षेपकांच्या नियमांबाबत सर्वांना समन्याय द्यावा, दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी मंडळांकडून करण्यात आली.

विसर्जन घाटांवर प्रकाश व्यवस्था उपलब्ध करणे, एलईडी स्क्रीन लावणे, मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे आणि बेवारस वाहने हटविणे, स्वच्छतेची कामे करण्याबरोबरच वाहतूक नियंत्रण योग्य पद्धतीने करण्याची सूचना महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. मंडळांना एक खिकी योजनेअंतर्गत विविध परवान्गया देण्यात येतील. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतील आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही डाॅ. भोसले यांनी दिली.