पुणे: प्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारीला दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सुटीप्रमाणेच २६ नोव्हेंबरला संविधान दिनाची सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी केली. या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभाग आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे २६ नोव्हेंबरला संविधान सन्मान दौड, मिनी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाची माहिती वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, मंदार जोशी आदी या वेळी उपस्थित होते.




विद्यापीठातील संविधान स्तंभापासून सकाळी सहा वाजता ही दौड सुरू होईल. खुला गट, २० वर्षांखालील गट आणि सोळा वर्षांखालील गटातील सुमारे दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांचा यात सहभाग आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल, असे वाडेकर यांनी सांगितले. विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याचे डॉ. खरे यांनी नमूद केले. विनामूल्य नोंदणी, अधिक माहितीसाठी ९६५७०७५१२३ किंवा ९८५०१११७१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.