लोकप्रियता आणि लोकानुरंजन करण्याच्या उद्देशातून होत असलेले राजकारण हेच लोकशाहीपुढचे आव्हान असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी रविवारी व्यक्त केले. लोकशाहीची उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारणांची कास धरावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेमध्ये ‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर विनय सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान झाले. राजकीय पक्षांसह समाजकारणाच्या होत असलेल्या ऱ्हासाची समीक्षा त्यांनी या वेळी केली.
राजकारण हा व्यवसाय झाला असून राजकारण म्हणजे आदर्शवाद हा विचार गळून पडला आहे. त्यामुळे नागरिकांचा झालेला भ्रमनिरास ही चिंतेची बाब असल्याचे सांगून सहस्रबुद्धे म्हणाले, राजकारण्यांवर समाजाचे प्रचंड दडपण आहे. निवडणूक कोणतीही असो निवडून येणे एवढाच हेतू उमेदवारापुढे राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीतील नेमका उद्देशच हरवला आहे. समाजाचे विभाजन जेवढे अधिक तेवढा प्रतिस्पर्धी उमेदवाराचा विजय निश्चित असा मतप्रवाह झाला असल्याने सध्याच्या निवडणुकांमध्ये अस्मितेचा मुद्दा पुढे उभा ठाकला आहे. निवडणुकीतील भ्रष्टाचाराला नागरिकांनी देखील मान्यता दिली आहे. लोकप्रियता आणि लोकानुरंजन करण्याच्या प्रक्रियेचा राजकीय पक्ष बळी ठरत आहेत.
मोदी सरकारच्या काळात लोकशाहीची उत्पादकता वाढत असल्याचे समाजकारण्यांसह पत्रकारांनीही मान्य केले आहे, याकडे लक्ष वेधून सहस्रबुद्धे म्हणाले, अमेरिकेतील छोटय़ा राज्यांच्या सभागृहामध्ये लॅपटॉप, इंटरनेटच्या माध्यमातून कामकाज चालत असल्याने लोकसहभाग वाढतो. मात्र, आपल्याकडे या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे लोकांचे प्रश्न बाजूलाच राहतात आणि त्याच प्रश्नांसाठी पुन्हा निवडणुका होतात. नागरिकांची निवडणुकीविषयीची आस्था कमी झाली, तर त्यांना दोष देता कामा नये. देशात आर्थिक सुधारणांबरोबरच राजकीय सुधारणांचीही चर्चा झाली पाहिजे. राजकीय पक्षांसह निवडणूक प्रक्रियेतही सुधारणा घडल्या पाहिजेत. सुधारणांची कास धरली, तर बदल निश्चित होतील अशी आशा ठेवायला वाव आहे. मंदार बेडेकर यांनी प्रास्ताविक केले.