पिंपरी: उत्सवकाळात नागरिकांना त्रास होणार नाही; तसेच रहदारीस अडथळा ठरणार नाही, याची गणेश मंडळांनी काळजी घ्यावी, अशी सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी केली. धोकादायक असणाऱ्या खाजगी व पालिकेच्या इमारती तात्काळ पाडाव्यात;  तसेच धोकादायक वृक्षांची त्वरित छाटणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पिंपरी पालिकेतील प्रशासकीय राजवटीत नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारी, अडचणी मांडण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय साप्ताहिक जनसंवाद सभांचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी नागरिकांकडून विविध अडचणी मांडल्या जातात.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करावी. पाऊस व खड्ड्यांमुळे खराब झालेले रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी खोदण्यात येऊ नये. खोदलेल्या धोकादायक ठिकाणी कृत्रिम अडथळे लावावेत. पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा. जलवाहिन्यांचे अर्धवट असलेले काम तातडीने पूर्ण करावे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी. पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे. पूर्वी सुरू असलेल्या मार्गांवर पुन्हा पीएमपी बससेवा सुरू करावी. चेंबरमधून गटारांतील पाणी रस्त्यांवर येते, त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरते. नाले वेळोवेळी स्वच्छ करावेत, रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत, अशा सूचना तथा तक्रारी नागरिकांनी जनसंवाद सभेच्या माध्यमातून केल्या आहेत. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही तातडीने केली जाईल, अशी ग्वाही त्या-त्या भागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.