नोटाबंदी हा भारतीय जनता पक्षाने केलेला शतकातील सर्वात मोठा महाघोटाळा आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेमध्ये आल्यावर या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करेल, असे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार आनंद शर्मा यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, विधान परिषदेतील आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कराचे (गुड्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिस टॅक्स-जीएसटी) प्रारूप हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे देशातील तीन कोटी ७६ लाख रोजगार नष्ट झाले आहेत. लघुउद्योग आणि बाजारपेठांवर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले आहेत, असे सांगून आनंद शर्मा म्हणाले की, जनेतच्या पैशाला जगासमोर काळा पैसा म्हणून हिणविणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. देशाची अर्थव्यवस्था काळ्या पैशांवर चालत होती का, चलनातून बाद झालेला ८६ टक्के काळा पैसा होता का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

जीएसटीमधील सर्वाधिक करपातळी ही अठरा टक्के असावी. त्यामध्ये रिअल इस्टेट, अल्कोहोल, वीज आणि पेट्रोलियम पदार्थाना सामावून घ्यावे, अशी काँग्रेसची मागणी होती. मात्र विश्वासघात करीत जीएसटी विधेयक मान्य करण्यात आले.

अशोक चव्हाण म्हणाले की, गरिबी हटाव असा नारा देणारेच आता गरिबांना हटवत आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र ढवळून काढण्यात येणार आहे. येत्या तेरा डिसेंबर रोजी या संदर्भात विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल, तर जानेवारी महिन्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनआक्रोश आंदोलन करून सरकारला जाब विचारण्यात येईल. कर्जमाफीच्या निर्णयानंतर शेतक ऱ्यांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत. देशात आणि राज्यातील सूत्रे काँग्रेसकडे आल्याशिवाय गरिबांचा विकास होणार नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonetisation the biggest scam of bjp says anand sharma
First published on: 18-11-2017 at 04:26 IST