पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. या महिन्यात डेंग्यूचे एकूण ३८९ संशयित रुग्ण आढळले आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. याचबरोबर चिकुनगुनियाचेही ८ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या महिन्यात डेंग्यूचे ३८९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ११ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. गेल्या महिन्यात संशयित रुग्णांची संख्या १५७ होती आणि निदान झालेला केवळ १ रुग्ण होता. जानेवारी ते मे या कालावधीत दरमहा संशयित रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी होती. जानेवारी ९६, फेब्रुवारी ७५, मार्च ६४, एप्रिल ५१ आणि मे ४४ अशी रुग्णसंख्या होती. त्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून मोठी वाढ झालेली आहे. शहरात या वर्षभरात डेंग्यूचे ८७६ संशयित रुग्ण आढळले असून, निदान झालेले २१ रुग्ण आहेत. यंदा शहरात चिकुनगुनियाचे १८ रुग्ण आढळले आहेत. त्यात फेब्रुवारी ५, मार्च ४, जून १ आणि आता जुलैमध्ये ८ रुग्ण आढळले आहेत. शहरात हिवतापाचा यंदा एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. हे ही वाचा. पिंपरी- चिंचवड : IAS पूजा खेडकर प्रकरणातील ‘त्या’ कंपनीचा लवकरच लिलाव होणार? पावसाळा सुरू असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या माध्यमातून पसरणारे संसर्गजन्य रोगही वाढले आहेत. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करण्याचे काम सुरू आहे. यंदा डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी १ हजार १७४ घरमालकांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून ४ लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हे ही वाचा. बनावट प्रमाणपत्राबाबत राज्यपालांची स्पष्ट भूमिका… म्हणाले, “घेणारे, देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई…” झिकाची रुग्णसंख्या ३७ वर शहरातील झिकाची रुग्णसंख्या ३७ वर पोहोचली आहे. त्यात एरंडवणे आणि डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक प्रत्येकी ८ रुग्ण आहेत. त्याखालोखाल मुंढवा ४, पाषाण ४, खराडी ३, आंबेगाव बुद्रुक, कळस, सुखसागरनगर, घोले रस्ता प्रत्येकी २, लोहगाव आणि धनकवडी प्रत्येकी १ अशी एकूण ३७ रुग्णसंख्या आहे. त्यातील १३ गर्भवती आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.