नैराश्येतून आईचे कृत्य; आत्महत्येचाही प्रयत्न

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत सहभागी झालेल्या अकरावर्षीय मुलाने अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या आईने त्याच्या डोक्यात स्वयंपाकघरातील पाटा घातला. त्यानंतर आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१ मे) पहाटे गुरुवार पेठ भागात घडली.

हर्षवर्धन अजित चव्हाण (वय अकरा, रा. गुरुवार पेठ) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची आई अंजली चव्हाण (वय ३२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली यांनी मुलगा हर्षवर्धन याच्या डोक्यात पाटा घालून स्वत:च्या डोक्यात पाटा घातल्याची घटना घडली. अंजली गंभीर जखमी झाल्या आहेत. हर्षवर्धन आणि त्याची आई अंजली यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजित चव्हाण (वय ४२) यांनी या संदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित चव्हाण यांचा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा हर्षवर्धन सहावीत शिकत आहे. हर्षवर्धन जलतरणपटू आहे. तो  २०१५ मध्ये राष्ट्रीय पातळीवर जलतरण स्पर्धेत सहभागी झाला होता. गेल्या वर्षी रशियात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याची निवड झाली होती. दरम्यान, हर्षवर्धन याने अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने आई अंजलीला चिंता वाटायची. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा स्वभाव चिडचिडा झाला होता. त्यांना नैराश्य आले होते. सोमवारी पहाटे अजित नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडले. त्या वेळी अंजली आणि हर्षवर्धन गाढ झोपेत होते. अजित घरातून बाहेर पडल्यानंतर अंजलीने हर्षवर्धनच्या डोक्यात स्वयंपाकघरातील पाटा घातला. त्यानंतर अंजलीने दगडी पाटय़ावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. तासाभरानंतर अजित घरी आल्यानंतर दोघे रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे त्यांनी पाहिले.

दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गुरुवार पेठ भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. केसरकर तपास करत आहेत.