लक्षणे ओळखणे पालकांसाठी अवघड; वैद्यकीय उपचार, समुपदेशनाची मदत मिळण्यास विलंब

नैराश्य फक्त मोठय़ा माणसांनाच येते असे तुम्हाला वाटत असेल, तर पुन्हा विचार करा. शालेय वयातील मुलांमध्येही नैराश्य आणि चिंता (एन्झायटी) ही लक्षणे दिसत असून ती ओळखणे पालकांसाठी अवघड जात आहे. अनेकदा मुलांना असलेली समस्या लक्षातच न आल्यामुळे त्यांना वैद्यकीय किंवा समुपदेशनाची मदत मिळण्यास उशीर होत असल्याचेही दिसून येत आहे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

शुक्रवारी (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिन आहे. ‘नैराश्याविषयी बोलूया’ असा या वर्षीच्या आरोग्यदिनाचा विषय आहे. या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने बालमानसोपचार क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ज्ञांशी संवाद साधला.

शालेय मुलांमध्ये अगदी लहान गटात जाणाऱ्या मुलांपासून पौगंडावस्थेपर्यंतची मुले येतात. या संपूर्ण वयोगटात नैराश्याची दिसणारी लक्षणे वेगवेगळी असतात. अनेकदा लहान मुलांमध्ये उदासपणा, निराशा अशी नेहमीची लक्षणे न दिसता चिंता वा भीतीच्या जवळ जाणारी भावना (एन्झायटी) अधिक दिसून येते, असे बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘लहान मुलांचा ‘मूड’ पटापट बदलतो. मित्र भेटल्यावर खेळायला जाणारे मूल घरी आल्यावर तोंड पाडून बसू शकते व अशा बदलणाऱ्या मूडमुळे मुले उदास होण्याचे नाटक करत आहेत, असेही आई-वडिलांना वाटू शकते. मुलांच्या वागण्याची नेहमीची तऱ्हा अचानक बदलली आहे का, याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. मुलांचे खाणेपिणे, एकाग्रता, वागण्यातील उत्साह, इतरांशी वागण्याची पद्धत, झोपेचे चक्र हे एकदम बदलले तर लक्षात येते. इतर समवयस्क मुलांना सहज जमणाऱ्या साध्या बदलांशी जुळवून घेणे एखाद्याला अवघड जाऊ शकते. नैराश्य ही भावना किंवा त्यामुळे इतर गोष्टींवर होणारे परिणाम सातत्याने प्रबळतेने टिकून राहात असतील तर त्याला नैराश्याचा विकार म्हणता येते.’’

लहान गोष्टींमुळे मुलांना निराशा येत असल्याचे बघायला मिळत असून त्यांची भावनिक स्थिरता कमी पडते, असे निरीक्षण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मीना बोर्डे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘अगदी साडेतीन वर्षांच्या मुलांपासून नकार पचवणे शक्य होत नाही. त्यातून चिडचिड, स्वभावातील आक्रमकता वाढणे आणि नंतर चिंता व नैराश्य हे दिसून येते. तर पौगंडावस्थेतील मुलांमध्ये घरातील वाद, शिस्तीच्या टोकाच्या कल्पना किंवा अचानक सवय असलेली शिस्तीची तऱ्हा बदलणे अशी कारणेही असू शकतात. आठवी, नववीच्या वयात काही मुलांमध्ये मित्रांच्या दबावामुळे व्यसनाधीनतेलाही सुरुवात होण्याची शक्यता असते. त्याचाही परिणाम होतो. अनेकदा मुलांना समुपदेशक व डॉक्टरांची मदत मिळण्यास खूप उशीर होत असल्यामुळे महत्त्वाचा काळ हातातून निघून जातो.’’

इतरही कारणे

* काही शालेय मुलांमध्ये नैराश्यासाठी जैवरासायनिक बदल कारणीभूत ठरतात. रक्तक्षय, ‘बी- १२’ जीवनसत्त्वाची कमतरता, वाढीच्या वयातील ‘थायरॉईड’च्या समस्या या सगळ्याचा विचार निदानाच्या वेळी करावा लागतो.

*  पौगंडावस्थेतील वर्तणूक समस्या किंवा नैराश्य संप्रेरकांची पातळी बदलल्यामुळे (हॉर्मोनल चेंजेस) आहे, असे सर्रास म्हटले जाते. ते सर्वाच्या बाबतीत खरे नाही. ‘हॉर्मोनल चेंज’ घडताना घरातील मंडळींकडून मुलांना मिळणाऱ्या वागणुकीवरही बरेच काही अवलंबून असते.

पौगंडावस्थेतील आत्महत्यांचे प्रमाण देशात वाढते आहे. ५० टक्के आत्महत्या मानसिक आजारांमुळे, तर ५० टक्के आत्महत्या प्रासंगिक कारणांमुळे होतात. या वयातील मुलांना जीव द्यावा वाटतो का किंवा स्वत:ला इजा करून घ्यावीशी वाटते का, हे पालकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. मुलांना स्वत:ची आताची ओळख सोडून नवी ओळख घ्यावीशी वाटते. स्वत:चे नाव बदलावेसे वाटणे, दुसऱ्या कुणाकडे जाऊन राहावेसे वाटणे, घरातून बाहेर राहू लागणे हे अशा वेळी घडते. त्याकडेही लक्ष देणे गरजेचे ठरते.

– डॉ. भूषण शुक्ल, बालमानसोपचारतज्ज्ञ