पिंपरी : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची मुर्ती लहान, पण किर्ती महान आहे. आता सकाळी लवकर कामाला लागा, लोकांना वेळ द्या, विधानसभेला वेळ द्यावा लागेल. जेवढं महत्वाचे पद, तेवढे जास्त कष्ट घ्यावे‌ लागतात. तुमच्या चिरंजीवाला जरा समजावून सांगा. घरातील व्यक्तीने चुकीचे कृत्य केल्यास स्वतःची, पक्षाची, सरकारची बदनामी होते, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांनी बनसोडे यांना दिला.

विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातील महायुतीच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा नागरी सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला होता. करोनात जिल्हा बंदी असतानाही बनसोडे यांचा मुलगा पसार झाला होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, बनसोडे यांच्यावर मोठी टीका झाली होती. हाच धागा पकडून अजित पवार यांनी चिरंजीवाला जरा समजावून सांगा असा सल्ला बनसोडे यांना दिला.

ठोस भूमिकेअभावी विलास लांडे राजकारणात पाठीमागे

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा प्रचार करणारे माजी आमदार विलास लांडे नेमक्या कोणत्या पक्षात याबाबत लोक मला विचारतात. सर्वांच म्हणतात लांडे आपलेच आहेत. सर्वपक्षीय राहिल्यामुळे त्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे काहीतरी भूमिका घ्यावी लागते. लांडे यांचे तळ्यात मळ्यात सुरू असते. एकनिष्ठ राहणारे बनसोडे कोठे गेले हे बघा असे सांगत लांडे यांना एक भूमिका घेण्याची सूचना पवार यांनी केली.

महायुतीचे सरकार येण्यात लाडक्या बहिणीचा मोठा हातभार

लोकसभेला महाविकास आघाडीचे ३३ खासदार निवडून आले. तेंव्हा गडबड झाली नाही. विधानसभेला दारुण पराभव झाला की मतदान यंत्रात मध्ये गडबड झाली, असे कुठे असते का? असा सवाल करून पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काहीतरी वेगळे केल्यामुळे महायुतीचे सरकार आले, असे बोलले जाते. पण, महायुतीचे सरकार येण्यात लाडक्या बहिणीचा मोठा हातभार आहे. कोयता गँग सहन केली जाणार नाही. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली पाहिजे. पोलिसांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत.

नदीकाठच्या वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींशी चर्चा

‘ग्लोबल वॉर्मिंगचा संकट आहे. त्यामुळे वृक्षतोड रोखायला हवी, नदी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मुळा नदी काठच्या वृक्षतोडीबाबत आणि नदीसुधारबाबत पर्यावरणवादी यांचे मत जाणून घेतले जाईल. महापालिका, जलसंपदा आणि पर्यावरणप्रेमींसोबत बैठक घेतली जाईल. त्यानुसार प्रकल्प राबविला जाईल, असेही पवार यांनी सांगितले.