हे देशाच्या जनतेचं दुर्दैव; अजित पवारांची मोदी सरकारवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर टीका केली

Deputy Chief Minister Ajit Pawar Criticism of Modi government
अजित पावर यांनी आज पुण्यात करोना आढावा बैठक घेतली

“अच्छे दिन आनेवाले है, म्हणून लोकांनी या सरकारला निवडून दिले. मात्र करोनामुळे जनता त्रासली आहे. केंद्र सरकारने त्यात लक्ष देऊन इंधनाचे दर कंट्रोल मध्ये ठेवले पाहिजेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर टीका केली. अजित पावर यांनी आज पुण्यात करोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, “देशात प्रचंड महागाई वाढली आहे. गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खूप वाढले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले, अनेकांचे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यासाठी लोकांनी आंदोलनं केली. पण केंद्र सरकार दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहा महिने होत आले. पण चर्चा होताना दिसत नाही.  आता तर लोकसभेचं अधिवेशनही संपलं आता पुढच्या वर्षी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित करता येईल. सध्या केंद्र सरकारची असलेली भूमिका ही देशाच्या जनतेचं दुर्दैव आहे”

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवीन निर्बंध?

अजित पवार म्हणाले, “मास्क वापरणं बंद केला तर खूप मोठ्या प्रमाणावर परिस्थिती बदलत आहे. पुण्यात जिथं जिथं कार्यक्रम, वाढदिवस झाले. तिथं संपूर्ण घरं करोना पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार नाही, पण पुणेकरांनी निर्बंध लावण्याची वेळ सरकारवर आणू नये. मात्र करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असेल तर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल.”

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लादणार का?, यावर बोलतांना अजित पवार म्हणाले, “नवीन निर्बंधाबाबत बैठकीच चर्चा झाली. परंतु मोठे मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याने, नवीन निर्बंध लादणार नाही. पण नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याचं दिवशी कठोर भूमिका घेण्यात येईल. त्यामुळे तशा प्रकारची वेळ येवू नये.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deputy chief minister ajit pawar criticism of modi government fuel prices high srk