पुणे : महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या प्रकरणांतील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्याचे विचाराधीन आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून, विधी व न्याय विभागाला अभ्यास करण्याचा आदेश देण्यात आला आहे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
चिंतामणी ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने गुरुजनगौरव पुस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी राज्य सरकार कठोर भूमिका घेत असते. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी संबंधित आरोपींविरुद्ध ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्याबाबत राज्य सरकार चाचपणी करत आहे. महिलेवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर खटला सुरू असेपर्यंत आरोपीवर ‘मकोका’ लावण्यासंदर्भात विचार करण्यात येत आहे.’
‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारीही सकारात्मक आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत या कायद्याची अंमलबजावणी करता येईल का, याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाला अभ्यास करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘तरुणीने तक्रार का दिली, त्याचा तपास सुरू’
‘कोंढवा येथील घटनेसंदर्भात पोलिसांनी तपास केला. या तपासादरम्यान वेगळ्याच गोष्टी समाेर आल्या आहेत. संबंधित तरुण-तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून मित्र आहेत. ते नियमित एकमेकांना भेटायचे, दोघांमध्ये संभाषण असायचे. तरुणीनेच त्याला फोन करून घरी बोलावले होते. कसलाही स्प्रे मारण्यात आला नव्हता, असे तपासात उघडकीस आले. मात्र, समाजात वेगळीच माहिती गेली. पोलीस आयुक्तांना वस्तुस्थिती मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. तरुणीने तक्रार करण्यामागील कारण काय, याबाबत तपास करण्याचा आदेश दिला आहे. महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर समाजातून तीव्र भावना व्यक्त केल्या जातात. सरकार, तपास यंत्रणांवर टीका करण्यात येते. मात्र, वस्तुस्थिती समोर येईपर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे,’ असे अजित पवार म्हणाले.