पुणे : महाराष्ट्रात महिला आरक्षणाची सुरुवात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळेच झाली. त्यांनी महिलांना सुरुवातीला ३३ टक्के आरक्षण दिले. महिला आरक्षणाचे विधेयक मान्य होणार नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी घेतली आणि हे विधेयक मान्य झाले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
जागतिक मातृदिनानिमित्त राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान आणि यशवंत क्लासेसच्या वतीने ‘मातृनाम प्रथम’ या कार्यक्रमात पवार बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, वर्षा तापकीर, राणी भोसले, अश्विनी भागवत, हर्षवर्धन पाटील, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या वेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी त्यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक आणले. महिला जर चूल आणि मूल आणि घर सांभाळू शकते, तर ती गाव, नगर परिषद, महापालिकादेखील सांभाळू शकते, असा विश्वास आम्हाला होता. महिला आरक्षणाचे विधेयक मान्य झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, अशी भूमिका पवार यांनी घेतली होती.