पुणे/नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम करताना झालेल्या चुकांवर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शनिवारी फैलावर घेतले. इमारत बांधताना सूर्यप्रकाश, हवा अधिकाधिक खेळती कशी राहील आणि ‘व्हेंटिलेशन’ कसे राहिले पाहिजे, याकडे लक्ष द्या. जनतेच्या पैशातून इमारती तयार होत असल्याने पैशाचा अपव्यय होणार नाही हे बघा,’ अशा शब्दांत सुनावले.
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी झाला. उद्घाटनापूर्वी पवार यांनी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. या पाहणीत जाणवलेल्या त्रुटी दाखवित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडा) पुणे विभागाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, आशा बुचके, गणपत फुलवडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपअधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी, अनिल मेहेर, सुजित खैरे, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार या वेळी उपस्थित होते.
पोलीस ठाण्याच्या नवीन बांधलेल्या इमारतीमध्ये उंची काही प्रमाणात कमी ठेवण्यात आली आहे. ही बाब उपमुख्यमंत्री पवार यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी याबाबत विचारणा केली असता पावसाचे पाणी शिरू नये, यासाठी उंची कमी ठेवल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. त्यावर पवार यांनी या भागात नक्की किती मिलिमीटर पाऊस पडतो, याची माहिती घेत पावसाचे पाणी जाऊ नये, हे कारण देऊ नका. सार्वजनिक इमारती उभारताना सूर्यप्रकाश, हवा अधिकाधिक खेळती कशी राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे. या इमारती जनतेच्या पैशांतून बांधल्या जातात. त्याचे काम चांगलेच झाले पाहिजे, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले.
२१ हजार कोटी रुपयांची तरतूद
पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांसाठी २१ हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे, त्यांपैकी सर्वाधिक १ हजार ४०० कोटी रुपयांचा निधी पुणे जिल्ह्याला देण्यात आला आहे. ४२ कोटी रुपये जिल्हा पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आले असून, हा निधी जिल्हा ग्रामीण दलाने समन्वय राखून सायबर गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना, अँटिड्रोन गन, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच अद्ययावत वाहने यासाठी खर्च करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
खासदार मेधा कुलकर्णींचा धसका
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी वेळेच्या अगोदर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून कोणाचीही वाट न पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उरकला होता. त्यावर भाजपच्या राज्यसभेच्या खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पवार यांना खासदार कुलकर्णी यांना बरोबर घेऊन पुन्हा उद्घाटन करावे लागले होते. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार १५ ते २० मिनिटे अगोदर दाखल झाले होते. कार्यक्रम सकाळी नऊ वाजता असल्याचे कार्यक्रमपत्रिकेत लिहिले असल्याचे लक्षात येताच कार्यक्रमस्थळी लवकर आलेल्या पवार यांनी इमारतीची पाहणी करून त्यानंतर ठरलेल्या वेळेनंतर इमारतीचे उद्घाटन केले. आपल्या मनोगतामध्येही या घटनेचा उल्लेख करत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला किस्सा पवार यांनी उपस्थितांना सांगितला.
आमदार शरद सोनवणे अनुपस्थित
राज्यात महायुतीची सत्ता असतानाही शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केलेले जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे हे कार्यक्रमाला अनुपस्थित होते. याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘सोनवणे यांचा फोन आला होता. नारायणगाव पोलीस अधिकारी सहकार्य करीत नसल्याने ते नाराज आहेत.’ कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रित करण्याच्या सूचनाही पवार यांनी प्रशासनाला केल्या.