बारामती : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’ने खाते उघडले असून, आणखी सहा गटांच्या निकालाची उत्सुकता असणार आहे.

बारामतीतील प्रशासकीय भवनामध्ये सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ‘ब’ गटाची मतमोजणी सुरू झाली. या गटात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या गटासाठी ९९ टक्के मतदान झाले होते. १०२ मतदारांपैकी १०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. त्यापैकी अजित पवार यांना ९१ मते मिळाली. भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’चे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना अवघी दहा मते मिळाली. अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे अजित पवार यांनी सहजपणे विजय मिळविला.

या कारखान्याच्या निवडणुकीसाठी ८८.४८ टक्के मतदान झाले असून, १९ हजार ५४९ मतदारांपैकी १७ हजार २९६ मतदारांनी मतदान केले. २१ जागांसाठी ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी ‘ब’ गटात अजित पवार हे उमेदवार होते. त्यांनी एकहाती विजय साकारला.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल यांच्यात चौरंगी लढत आहे. पहिल्याच निकालात ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’ने खाते उघडले आहे.

अन्य गटांच्या निकालाची उत्सुकता

या कारखान्याच्या निवडणुकीसाठी सात गट आहेत. गट १- माळेगाव, गट २ -पणदरे, गट ३ सांगवी-कांबळेश्वर ८, गट ४ – खांडज-शिरवली, गट ५ – नीरा-वागज, गट ६ – बारामती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘ब’ गटातून उभे होते. त्यांनी अध्यक्षपदासाठी स्वत:चे नाव घोषित केले आहे. त्यामुळे या निवडणुकीला रंगत आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला

इंदापूर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पॅनेलने युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचा प्रचार केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार हे विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा समोरासमोर आले. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.